Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर जिल्ह्यात 81 टक्के पंचनामे

Share

2 लाख 37 हजार हेक्टर क्षेत्राला फटका

अहमदनगर (प्रतिनिधी)- परतीच्या व अवकाळी पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे नगर जिल्ह्यामध्ये 3 लाख 84 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. सरकारने या नुकसानीची दखल घेत नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पंचनामे सुरू करण्यात आले असून गुरूवार (दि.7) पर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 37 हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. नुकसानीच्या प्राथमिक अंदाजाच्या तुलनेत पंचनाम्याचे 81 टक्केच काम पूर्ण होऊ शकले आहे.

पावसामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील सर्व क्षेत्राचे पंचनामे 7 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण व्हावेत, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने महसूल आणि कृषी विभागाला दिले होते. मात्र, या दोन्ही विभागाचे काम कासव गतीने सुरू असल्याने पंचनामे केव्हा व कधी पूर्ण होणार, तसेच मदत कशी मिळणार, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागलेले आहे. जिल्ह्याला परतीच्या व अवकाळी पावसाने जबरदस्त तडाखा दिला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 5 लाख 91 हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली होती. यातील 2 लाख 93 हजार 14 हेक्टवरील पिकांना अवेळी आणि अतिवृष्टीचा दणका बसला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील 1 हजार 529 गावातील 3 लाख 84 हजार शेतकर्‍यांना फटका असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्त क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्यानंतर कृषी विभाग, तलाठी व अन्य यंत्रणेमार्फत नगर जिल्ह्यामध्ये पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

द्विवेदी यांनी स्वतः राहाता, राहुरी, शेवगाव व नेवासा या तालुक्यांमधील विविध गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी केली. तसेच त्यांच्याकडून नुकसानग्रस्त क्षेत्राचे केल्या जाणार्‍या पंचनाम्यांबाबत सातत्याने आढावा घेतला जात आहे. त्यानुसार गुरूवारी सायंकाळपर्यंत जवळपास 2 लाख 37 हजार 202 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण करण्यात झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. उर्वरीत बाधित क्षेत्राचे पंचनामे देखील वेगाने पूर्ण केले जावेत, अशा सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

बाधित क्षेत्र वाढणार
जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने जबरदस्त तडाखा दिलेला आहे. त्यानंतर 1 तारखेपासून पंचनाम्याच्या कामाला सुरूवात झालेली आहे. मात्र, बुधवारी पुन्हा जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळात पुन्हा वीजच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे बाधित क्षेत्र वाढणार आहे. त्यात पंचनाम्याचा वेग मंद असल्याने शेतकर्‍यांमध्ये चिडेचे वातावरण आहे.

असे झाले पंचनामे कंसात हेक्टर क्षेत्र
नगर 8932 शेतकरी (6 हजार 431), पाथर्डी 4121 (31 हजार 37), पारनेर 11331 (8 हजार 384), कर्जत 12362 (9 हजार 145), श्रीगोंदा 27723 (19 हजार 787), जामखेड 5487 (2 हजार 885), श्रीरामपूर 23823 (20 हजार 682), नेवासा 26702 (21 हजार 860), शेवगाव 26925 (23 हजार 925), राहुरी 25482 (18 हजार 86), संगमनेर 19065 (17 हजार 46), अकोले 20291 (9 हजार 870), कोपरगाव 35198 (26 हजार 372), राहाता 17891 (21 हजार 961) असे आहेत.

पंचनामे करणार्‍यांची मनमानी
जिल्ह्यात 14 तालुक्यांत अवकाळी आणि परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा पंचनामे सुरू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांची मनमानी सुरू आहे. उभ्या पिकांचे पंचनामे करणार, सोंगलेल्या पिकांचे पंचनामे करणार नाही, अशी मनमानी त्यांच्याकडून सुरू आहे.अनेक ठिकाणी शेतकर्‍यांचे सायीबीन, मका, बाजारी, कपाशी शेतात जमीनीवर पडून त्या ठिकाणी त्याचे नुकसान झालेले असतांना केवळ चिरीमिरीसाठी पंचनामे करणारे शेतकर्‍यांची अडवणूक करत आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी याकडे जातीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यात 1 तारखेपासून 1 हजार 529 गावांत बाधीत शेतकरी आणि क्षेत्राचा पंचनामा सुरू केला आहे. यात 3 लाख 3 हजार शेतकर्‍यांचे पंचनामे करण्यात आले असून त्याची टक्केवारी 80 टक्के आहे. तर 2 लाख 37 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले असून त्याची टक्केवारी 81 टक्के आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!