नगरकर गारेगार!

0

पारा 4.9 अंशांवर द्राक्ष बागायतदार पुन्हा धास्तावले 

अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या तीन-चार दिवसांपासून नगर जिल्ह्यात थंडीची लाट आली असून काल या थंडीने आपली सीमा ओलांडलेली पाहायला मिळली. नगरमध्ये किमान तापमानाचा पारा 4.9 अंश सेल्सियसपर्यंत खाली असल्यानं नगरकरांना चांगलीच हुडहुडी भरलीय. त्यामुळे नगरकरांना आता स्वेटर तसेच अन्य गरम कपडे घालून बाहेर पडण्याची पुन्हा वेळ आली आहे.

दरम्यान, नगर तालुक्यातील निबोंडी शिवारात सापडलेल्या युवकाचा गारठ्यानेच मृत्यू झाल्याचा कयास आहे. तसेच सर्दी, डोकेदुखी, दमा यासारखे आजार बळावले आहेत.  नाशिकमध्ये निचांकी 4, जळगाव 7.4, औरंगाबाद 6.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे नगरकर चांगलेच गारठले आहेत. गेल्या काही वर्षांत फेब्रुवारी महिन्यात प्रथमच तापमानाचा पारा इतका खाली गेला आहे. उत्तरेकडील थंड वार्‍यांच्या प्रभावामुळे तापमानात घट झाल्याचे हवामान खात्यानं सांगितले आहे. थंडीबरोबरच सकाळी उशिरापर्यंत धुक्याची चादर पसरली होती. कडाक्याच्या थंडीमुळे ऊस तोडणीलाही अनेक ठिकाणी विलंब होत आहे. तसेच द्राक्ष बागायदार धास्तावले आहेत.

मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
दरम्यान काल रविवारीही अहमदनगर जिल्ह्यात शीतलहर होती. मंगळवारी नाशिक जिल्ह्यात गारपीट होईल, अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तविलीय. दरम्यान सोमवारी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर उत्तर मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता आहे. मंगळवारीही मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

LEAVE A REPLY

*