तांबेंचे सोने, वारेंची भरारी

0

नगर टाइम्स,

पक्ष पदवाटपात विखे-थोरातांचा समझोता भिंगारदिवेही उजळले

अहमदनगर (प्रतिनिधी) – गटबाजीमुळे कान उपटल्यानंतर काँग्रेसमधील मातब्बर नेते, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व माजी महसूलमंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांनी आपसात समझोता केला आहे. प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय येत आहे. हे प्रदेशाध्यक्षपद थोरातांचे भाचे सत्यजीत तांबे यांना बहाल केले जाणार आहे. या पदामुळे त्यांचे सोने झाले आहे. कारण गेल्या पाच-सहा वर्षांपासून ते या पदासाठी हटून बसले होते. तर दुसरीकडे विखे गटाचे माजी नगरसेवक निखील वारे यांनीही भरारी घेतली आहे. त्यांना शहर जिल्हाध्यक्षपद मिळणार आहे. या राजकीय समझोत्यात कुलदीप भिंगारदिवेही उजळून निघाले आहेत. त्यांच्याकडे ग्रामीण पदभार मिळणार असल्याचे समजते. त्यामुळे निवडणूक ही केवळ औपचारिकता असल्याची कार्यकर्त्यांत चर्चा आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाधिकारी निवडीसाठी लोकशाही पध्दतीने मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात युवक काँग्रेस पदाधिकारी निवडीसाठी मतदान सुरू आहे. नगर शहरातील सावेडीमधील बंधन लॉन येथे सकाळपासून मतदान सुरू आहे. नगर शहरात 3 हजार 9 मतदार आहेत. अत्यंत शिस्तीत हे मतदान सुरू आहे.
प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे हे लढवित आहेत. आमदार अमित झनक आणि कुणाल राऊत यांच्यासह तिघे निवडणूक रिंगणात आहेत. मावळते प्रदेशाध्यक्ष विश्‍वजीत कदम यांनी तिघांत समझोता केला, मात्र निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार असल्याने मतदान सुरू आहे. तांबे यांचे नाव निश्‍चित झाले असले तरी त्यासाठी मतदान घेतले जात आहे. तांबे यांना जिल्ह्यातून मतदान करण्याचा निर्णय विखे गटाने घेतला. मात्र त्या बदल्यात नगर शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष ही दोन्ही पदे विखे गटाने पदरात पाडून घेतली. नगर शहरजिल्हाध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक निखील वारे आणि ग्रामीणसाठी कुलदिप भिंगारदिवे यांना मतदान केले जात आहे. या दोघांनाही थोरात गटाचे कार्यकर्ते मतदान करत आहेत. आता या दोघांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे.

महापालिकेतही होणार समझोता
नगरात महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहे. युवक काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या निवडीत जसा समझोता झाला तसा समझोता महापालिका निवडणुकीतही होईल असा दावा विखे-थोरात समर्थक करत आहेत.

LEAVE A REPLY

*