Type to search

Featured सार्वमत

शहरात ठिकठिकाणी श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात

Share

श्रीराम हे मानवी जीवनाच्या सद्गुणांचे प्रतिक

गोविंद महाराज शास्त्री : श्रीरामनवमीनिमित्त बुरुडगावरोड, श्रीरामनगर येथे जन्मोत्सव सोहळा

 

श्रीरामनवमीनिमित्त बुरुडगांवरोड, श्रीरामनगर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी गोविंद महाराज शास्त्री यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसंघर्ष मित्रमंडळ व श्रीराम भक्तसेवा मंडळाचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहमदनगर (प्रतिनिधी)- मानवी जीवनात प्रत्येक दिवसाची सुरुवात एकमेकांला राम-राम करुन होते. तर जीवनाचा शेवट ही रामनामानेच होतो. इतका आपल्या आयुष्यात राम ओतप्रोत भरलेला आहे. आपले आयुष्यात कितीही केले तरी अपुरे आहे. त्याला परिपूर्णकडे नेण्यासाठी श्रीराम कथा आहे. कारण श्रीरामाचे जीवन म्हणजे मानवी जीवनाच्या सद्गुणांचे साक्षात प्रतिक आहे. आपल्याला आदर्श समोर असावा लागतो. म्हणजे त्या दिशेने वाटचाल करणे सोयीचे जाते. रामायण ही एक दिशा आहे. कारण ते आबालवृद्धाला मनापासून आवडते. श्रीरामाने केलेले कार्य समाज जीवनाचा आदर्श आहे, असे प्रतिपादन हभप गोविंद महाराज शास्त्री यांनी केले.

श्रीरामनवमी निमित्त बुरुडगांवरोड, श्रीरामनगर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी हभप गोविंद महाराज शास्त्री यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शिवसंघर्ष मित्र मंडळ व श्रीराम भक्त सेवा मंडळाचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. दुपारी सजवलेल्या पाळण्यात श्रीरामची मूर्ती ठेवून पाळणा हलविण्यात येऊन महिलांनी पाळणा गिते गायीली. श्रीरामनवमीनिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. फुलांनी सजवलेल्या मंदिरात भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. यामध्ये महिलांची उपस्थित लक्षणिय होती. किर्तनानंतर श्रीराम जन्मोत्सव झाला, यावेळी फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. यावेळी श्रीरामनगर, साळूंकेमळा, चौरे मळा, बाबर मळा, पटवेकर मळा, एकाडे मळा, राऊत मळा, नन्नवरे मळा, औसरकर मळा, दरंदले मळा आदि भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवननगरमध्ये श्रीराम उत्सव, मूर्तीची पालखी मिरवणूक उत्साहात

पवननगर येथील श्रीराम मंदिरातील उत्सव मूर्तीच्या पालखी मिरवणुकीत सहभागी झालेले श्रीराम सेवा समितीचे कार्यकर्ते व भालदार, चोपदार व तुतारी पथक आदी.

अहमदनगर (प्रतिनिधी)- पवननगर येथील श्रीराम हनुमान मंदिरातील प्रभू श्रीरामाच्या उत्सव मूर्तीची पालखी मिरवणूक मोठया उत्साहात पार पडली. श्रीराम मंदिरात पूजा करून फुलांनी सजवलेली पालखी घेऊन श्रीराम सेवा समितीचे अध्यक्ष प्रशांत भालेराव यांच्या निवासस्थानी आली. तेथे श्रीरामाच्या उत्सव मूर्तीची विधीवत पूजा करण्यात आली. तेथून ही पालखी प्रशांत भालेराव यांनी खांद्यावर घेऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला. प्रभू श्रीराम चंद्र की जय, श्रीराम जयराम जय जय राम, रघुपती राघव राजाराम अशा अभंग गायनाने श्रीरामाचा जयघोष करीत तुतारीच्या निनादात, टाळ-मृदंगाच्या साथीने भक्तिगीते व अभंग म्हणत ही पालखी मिरवणूक पुढे निघाली. पवननगर, गोकुळनगर, साईराम नगर, कुशबा नगरी, तुळजानगर, नंदनवन नगर मार्गे ही पालखी पुन्हा श्रीराम मंदिरात पोहचली.

पालखी मिरवणूक मार्गावर परिसरातील महिलांनी रस्त्याच्या दुतर्फा सडासम्मार्जन करून आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. मिरवणूक मार्गावर आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. पालखी वर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. प्रभू श्रीरामाच्या उत्सव मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पालखी मिरावणुकीकडे धाव घेतली. या मिरवणुकीत बँड पथक, तुतारीवादक, भालदार-चोपदार, अब्दागिरी, छत्री, भगवे ध्वज, टाळ-मृदंग पथक, भजनी मंडळ सहभागी झाले होते. याप्रसंगी ह.भ.प. संदीप महाराज खोसे, ज्ञानदेव दारकुंडे, राजन पोहेकर, संतोष कुलकर्णी, चंद्रकांत दगडे, शिरीष कुलकर्णी, रमेश म्हस्के, नंदकुमार कुलकर्णी, विश्वासराव देशमुख, आदिनाथ सामृत, संजय टेके, दत्तू सुरसे, अजय भालेराव, शहाजी कदम, विजय भंडारी, शांतीलाल मुनोत, विश्वास देशमुख, शिरीष कुलकर्णी, संतोष कुलकर्णी, नकुल दायमा, अनिल दूतारे, विनय तिवारी, सारंग तरडे यांच्या सह श्रीराम सेवा भजनी मंडळ, महिला भजनी मंडळे व परिसरातील भाविक भक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते.

गोंदवलेकर महाराज मंदिरात रामनवमी उत्साहात

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी उपनगरात शिलाविहार येथील श्री. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात आज दुपारी 12 वाजता श्रीराम नवमी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत येथे विविध नामजपाचे आयोजन करण्यात आले होते. सुंदरदास रिंगणे, रेखाताई रिंगणे यांनी रामभक्तांकडून नामजप करून घेतला.
रामनवमीला ब्रम्हचैतन्य सेवा-भक्ती मंडळाने भजने सादर केली. दुपारी 12 वाजता श्रीराम जन्म सोहळा पार पडला. महिलांनी पाळणा गीते सादर केली. भाविकांनी श्रीराम, जय रामाचा घोषणेने सर्व परिसर दुमदुमला होता. जन्मोत्सवानंतर महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. श्रीराम चौकांत श्रीरामाचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रामनवमी साजरी केली. यावेळी दिलीप गाडे, दिनेश कुलकर्णी, संदीप रासकर, नाथा गायकवाड, अण्णा चांदकोठी, संजय कर्डिले यांच्यासह भाविक मोठ्या संख्याने उपस्थित होते.

प्रभूला शरण गेल्याशिवाय संकट निवारण नाही

कीर्तनकार चैत्राली जोशी : रामदासी वाड्यात श्रीराम जन्म

गुजरगल्ली येथील रामदासी वाड्यात श्रीराम जन्मोत्सव भक्तीपूर्ण वातावरणात व शेकडो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी किर्तनकार चैत्राली जोशी यांचे श्रीराम जन्मोत्सवावर नारदीय किर्तन झाले.

अहमदनगर (प्रतिनिधी) – श्रीराम नवमी निमित्त गुजर गल्ली, स्वामी विवेकानंद चौकातील रामदासी वाड्यात प्रभूरामचंद्रांच्या जयजयकारात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दि. 6 एप्रिल गुढीपडावा पासून सुरु झालेल्या श्रीरामाच्या नवरात्र उत्सवाची सांगता झाली. या निमित्त पुण्याच्या प्रसिद्ध नारदीय कीर्तनकार चैत्राली जोशी यांचे राम जन्मावर कीर्तन झाले.  खा.दिलीप गांधी व सौ.सरोज गांधी यांच्या हस्ते देवघरातील प्राचिन राममुर्तीची महाआरती यावेळी करण्यात आली. सुनील रामदासी यांच्या वाड्यात श्रीराम जन्म साजरा करण्याची सुमारे 100 वर्षाहून अधिक जुनी एतेहासिक परंपरा आहे. त्यांच्या देवघरात सज्जन गडचे समर्थ रामदास स्वामी यांच्या पूजेतील रामाच्या मूर्ती सारखीच रामाची पुरातन मूर्ती आहे. दरवर्षी रामनवमी निमित्त मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते.
यावेळी कीर्तना नंतर महाआरती करण्यात आली. तसेच उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी खा.दिलीप गांधी, भाजपा मध्यमंडळ अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, माजी नगरसेवक किशोर डागवाले, किशोर बोरा, अजित बोरा, धनश्री विखे, गौतम दीक्षित, वाल्मिक कुलकर्णी, आदींसह मोठ्या संख्यने भाविक उपस्थित होते. सुनील रामदासी, सुहास रामदासी व संगीता रामदासी यांनी सर्वांचे स्वागत केले.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!