Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

अहमदनगर: के. के. रेंजमध्ये बॉम्बचा स्फोट; दोघांचा मृत्यू

Share

तोफगोळ्यातून शिसं काढताना घडली घटना

अहमदनगर (प्रतिनिधी) – मिलिटरीने डागल्यानंतर न फुटलेल्या तोफगोळ्यातील शिसं काढताना झालेल्या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला. केके रेंज आणि खारेकर्जुनेच्या बॉर्डरवर मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय नवनाथ गायकवाड (वय 19) आणि संदीप भाऊसाहेब धिरवडे (वय 32, रा. दोघेही रा. खारेकर्जुने) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. नगरच्या के.के.रेंजमध्ये मिलिटरीचा सराव सुरू असतो. रणगाड्यातून तोफगोळा आणि बंदुकीतून फायरची प्रॅक्टीस येथे केली जाते. त्यासाठी हजारो एकरचे क्षेत्र मिलिटरीच्या ताब्यात आहे. प्रॅक्टीस नंतर अर्ध्या तासाने त्याचे भंगार गोळा केले जाते. प्रॅक्टीसदरम्यान अनेक गोळे फुटत नाहीत. फुटलेले तोफगोळे भंगार म्हणून गणले जाते. ते गोळा करण्याचा ठेका देण्यात आला आहे. तो ठेका घेतलेल्या ठेकेदाराने विळद, खारेकर्जुने परिसरातील तरुणांना रोजंदारीवर भंगार गोळा करण्यासाठी ठेवले आहे. त्यासाठी त्यांना ओळखपत्रही दिले आहेत.

मिलिटरीची प्रॅक्टीस संपल्यानंतर ठेकेदाराची ही मुलं भंगार गोळा करतात अन् ते ठेकेदाराकडे आणून देतात. या दरम्यान अनेकांना न फुटलेले तोफगोळे सापडतात. पण ते भंगारात न देेता तेथेच जमिनीत पुरून ठेवतात अन् ती जागा शोधून ते रात्रीच्या वेळी घरी नेतात. त्यातील शिसं, पावडर काढून विकून भरपूर पैसे मिळत असल्याने परिसरातील अनेक तरुण हा ‘उद्योग’ करतात.

अक्षय गायकवाड आणि भाऊसाहेब धिरवडे हे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास के.के.रेंजच्या हद्दीत भंगार गोळा करण्यासाठी गेले होते. तेथे न फुटलेला तोफगोळा त्यांना सापडला. तो घेऊन ते दोघं बॉर्डरबाहेर आले. तो निकामी करून त्यातील शिसं आणि पावडर काढत असतानाच त्याचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की त्यात या दोघांच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. प्रॅक्टीस थांबली असतानाही मोठा आवाज झाल्याने आसपासचे लोक धावत तिकडे गेल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला.

लग्नापूर्वीच गेला अक्षयचा जीव
यातील अक्षय गायकवाड यांचे लग्न जमले आहे. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याने अखेरचा श्‍वास घेतला. गायकवाड हा खारेकर्जुनेचा रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तीन महिन्यापूर्वी झाला होता वाघाचा शेवट
तीन महिन्यापूर्वी अशीच घटना गावात घडली होती. मिलिटरीची प्रॅक्ट्ीस सुरू असतानाच गौतम वाघ नावाचा तरुण हद्दीत घुसला. डागलेला गोळा त्याच्या पोटात घुसला. त्याने हाताने पोट दाबून धरत शेजारीच असलेल्या डोंगर कपारीचा सहारा घेतला. रक्तस्त्राव प्रचंड झाल्याने त्याने तेथेच दम तोडला. दोन-तीन दिवसांनंतर तो मृत झाल्याचे गावकर्‍यांना समजले. अशा घटना या परिसरात नेहमीच घडतात.

बॉम्बच्या हादर्‍याने अनेक मुलं भयभीत झाले. घाबरलेली ही मुलं तातडीने दवाखान्यात आली. परिसरातील आदिवासी तरुण पैशासाठी जीवावर खेळून हा ‘उद्योग’ करतात. त्याला प्रतिबंध घातला पाहिजे. यापूर्वीही अशा अनेक घटना येथे घडल्या आहेत.
– डॉ. दिलीप पवार, पंचायत समिती सदस्य.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!