अशोक लांडे खून प्रकरणी कोतकर बंधूंना जामीन

अशोक लांडे खून प्रकरणी कोतकर बंधूंना जामीन

अहमदनगर (प्रतिनिधी) – लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा माजी महापौर संदीप कोतकर आणि त्याचा भाऊ सचिन कोतकर या दोघांनाही मुंबई उच्च न्यायालयाने अटी शर्तीवर जामीन मंजूर केल्याची माहिती अ‍ॅड.अभयकुमार ओस्तवाल यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे, न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांनी सोमवारी (दि. 13) सकाळी जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच माजी महापौर संदीप कोतकरला केडगाव हत्याकांडात जामीन मिळालेला आहे. 2008 मध्ये लॉटरी विक्रेता अशोक लांडे याचा खून झाला होता. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शंकर राऊत यांनी खून प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा पोलिसांनी तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यात काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष भानुदास एकनाथ कोतकरसह त्याची तीन मुले माजी महापौर संदीप कोतकर, सचिन कोतकर व अमोल कोतकर यांचा आरोपींमध्ये समावेश होता.

या चौघांनाही नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने 2016 मध्ये जन्मठेपची शिक्षा ठोठावली होती. तर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची निर्दोष सुटका केली होती.

शिक्षा सुनावल्यापासून म्हणजे 2016 पासून संदीप कोतकर, सचिन कोतकर हे नाशिक जेलमध्ये होते. या शिक्षेविरोधात त्यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. या अपील सुनावणी दरम्यान दोघांचाही जामीन अर्ज अ‍ॅड.अभयकुमार ओस्तवाल यांनी न्यायालयासमोर ठेवला. त्या सुनावणीत न्यायालयाने दोघांनाही अटी, शर्तीवर जामीन मंजूर केला.

संदीप आणि सचिन कोतकर यांना जामीन मंजूर करताना जिल्हाबंदी, साक्षीदारांच्या गाठीभेटी न घेण्याबरोबरच धमकावणे आदींपासून दूर राहण्याचे न्यायालयाने सांगितल्याचे समजते. अशोक लांडे खून प्रकरणात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर यांच्यासह त्यांचे पुत्र माजी महापौर संदीप, सचिन आणि अमोल यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. भानुदास कोतकर यास आजारपणामुळे तर अमोल कोतकरलाही याच प्रकरणात जामीन मंजूर झालेला आहे.

दरम्यान महापालिकेच्या केडगाव पोटनिवडणुकीत संजय कोतकर व वसंत ठुबे या दोघा शिवैनिकांचा खून झाला होता. त्यातही संदीप कोतकर हा आरोपी असल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे. जानेवारी 2019 जिल्हा पोलिसांनी संदीप कोतकरला या गुन्ह्यात वर्ग केले होते. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संदीप कोतकर याचा जामिन अर्ज जिल्हा न्यायालयात दाखल केला होता. या जामिन अर्जावर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. विवेक म्हसे, अ‍ॅड. महेश तवले यांनी बाजू मांडली होती. दोन्ही बाजूचा युक्तिवादानंतर जिल्हा न्यायालयाने कोतकर याचा जामीन अर्ज मागील आठवड्यात मंजूर केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com