Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या राजकीय सार्वमत

गडाख-घुलेंच्या दिलजमाईने राजकीय कलाटणी !

Share

नेवासा मतदारसंघातील ‘सहकार’ : पाहुण्या-रावळ्यांचे आमदार अडचणीत

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- नेवासा-शेवगाव तालुक्यातील सहकारातील दिग्गज घराणी घुले-गडाखांच्या वारसदारांची राजकीय दिलजमाई झाल्याने नेवासा विधानसभा मतदारसंघातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. शंकरराव गडाख व चंद्रशेखर घुले यांच्यातील सहमती एक्सप्रेस दिवसभर चर्चेत होती. यामुळे पाहुण्या-रावळ्यांचे आमदार म्हणून सातत्याने टीका झेलणारे भाजपाचे बाळासाहेब मुरकुटे यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.

माजी आ.चंदशेखर घुले, शंकरराव गडाख आणि प्रशांत गडाख यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रवादीचे नेवासा तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले यांच्या भेंडा खुर्द येथील निवासस्थानी बैठक केली. या बैठकीचे वृत्त आणि छायाचित्र काही वेळातच व्हायरल झाले. गडाख-घुले या दोन राजकीय शक्तींमध्ये निर्माण झालेल्या वितुष्टाचा फायदा 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आ. बाळासाहेब मुरकुटे यांना झाला. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नेवासा तालुक्यात गडाख-घुले यांच्यातील राजकीय संघर्षामुळे दोघांच्याही गोटाचे नुकसान झाले. त्यामुळे राजकीय दबदबा पुन्हा वाढविण्याच्या प्रयत्न म्हणून घुले-गडाखांच्या खेळीकडे पाहिले जात आहे.

गडाखांनी राष्ट्रवादीचा त्याग केल्यानंतर त्यांना ‘ऑफर’ येऊनही त्यांनी भाजप-सेनेत जाण्याचे टाळले. क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून राजकारण करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गडाख यांच्या भाजप-सेना प्रवेशाच्या चर्चा झडल्या. मात्र गडाख ‘क्रांतिकारी’वर ठाम राहिल्याने त्या केवळ वावड्या असल्याचे स्पष्ट झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर ‘ईडी’मार्फत गुन्हा दाखल झाल्याची घटना राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांना चांगलीच मनाला लागली. ही कारवाई म्हणजे युती सरकारने राजकीय सूड भावनेतून केलेला उद्योग असल्याचा आरोप झाला. यातून मतदारसंघात खचलेल्या कार्यकर्त्यांना ही दिलजमाई उभारी देणारी ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जातो.

घुले यांनी मोठ्या मनाने शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून माघार घेत प्रताप ढाकणे यांना पुढे केले आहे. त्यामुळे शेवगाव मतदारसंघातील भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यासमोर आव्हान उभे झाले आहे. नेवाशातही गडाखांशी दिलजमाई करत राजकारणाला धक्का दिला आहे. गडाख यांचा मूळ पिंड काँग्रेस-राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे नेवासा मतदारसंघातून भाजपची जागा निवडून येऊ नये, या व्यापक भूमिकेतून त्यांनी गडाखांना साथ देण्याचे ठरविल्याची चर्चा आहे.

दरम्यान, 10 ऑक्टोबर रोजी कुकाणा येथे मेळावा घेऊन घुले-गडाख जाहीरपणे आपली संयुक्त राजकीय दिशा स्पष्ट करणार आहेत. या दिलजमाईमुळे एकीकडे या विभागातील सहकार क्षेत्रात घुमसणारा संघर्ष कमी होणार आहे. तर दुसरीकडे दोघांच्या भांडणात फायदा घेणार्‍या विद्यमान आमदार मुरकुटे गटालाही फटका बसणार आहे. प्रत्यक्ष निवडणुकीवर या घटनेचे कसे परिणाम होणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!