Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

गारखिंडी घाटात पोलिसांचे वाहन कोसळले

Share

उपनिरीक्षकांसह तिघे जखमी

पारनेर (तालुका प्रतिनिधी) – खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या ताफ्यात असलेले पारनेर पोलिसांचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात पोलीस उपनिरीक्षकांसह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही घटना पिंपळगाव-अळकुटी रोडवरील गारखिंडी घाटात बुधवारी दुपारी घडली.

खासदार डॉ. विखे पाटील बुधवारी पारनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांनी दुपारी एकच्या दरम्यान मांडओहोळ धरणावर पाहणी केली. यानंतर त्यांचा ताफा पिंपळगाव रोठामार्गे अळकुटीकडे चालला होता. याचवेळी खा. डॉ. विखे पाटील यांच्या ताफ्यात असलेले पारनेर पोलिसांचे वाहन गारखिंडी घाटातील वळणावर उलटून दरीत कोसळले. या अपघातात पारनेरचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने यांच्यासह तीन पोलीस जखमी झाले असून चालक पो. कॉ. पोपट मोकाते यांचा पाय मोडला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी विळद येथील विखे पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती कळताच खा. डॉ. विखे, राहुल शिंदे व डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी पोलीस कर्मचार्‍यांना तातडीने मदत करून उपचारासाठी पाठविण्यात आले. खा. डॉ. विखे भाळवणी, वासुंदे, टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या व मांडओहळ दौरा आटोपून पिंपळगाव रोठाकडे निघाले असता गारखिंडी घाटात वाहनाचा जॉइंट रॉड तुटल्याने वाहन सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळले.

अपघाताच्या वेळी तेथून जात असलेले पिंपळगाव रोठा गावातील तरुण गोपीनाथ घुले यांना वाहन दरीत कोसळल्याचे समजताच त्यांनी आपले सहकारी राहुल पाटील शिंदे यांच्या मदतीने दोरखंडाच्या साहाय्याने दरीत उतरून जखमी पोलिसांना बाहेर काढले व जवळील दवाखान्यात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी विळद येथे पाठविण्यात आले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!