Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नांदूर शिंगोटे-तळेगाव-कोल्हार मार्गाच्या चौपदरीकरणास शासनाची मान्यता – ना. विखे

Share

संगमनेर (प्रतिनिधी) – लोणी तळेगाव मार्गे नांदूरशिंगोंटे गावाला जोडल्या गेलेल्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दिला असून या कामास 7 कोटी 33 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

यासंदर्भात बोलताना ना. विखे पाटील म्हणाले की, राज्य मार्ग क्र. 31 हा नाशिक आणि नगर जिल्ह्याला जोडला गेलेला महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर असणार्‍या गावातील वाहतुकीबरोबरच बाहेरून येणार्‍या वाहनांची तसेच औद्यागिकीकरणासाठी आवश्यक असलेल्या अवजड वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या मार्गाचे रुंदीकरण झाल्यास स्थानिक पातळीवरील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होईल आणि नगर तसेच अन्य शेजारील जिल्ह्यामध्ये जाणार्‍या प्रवाशांसाठी तसेच औद्योगिक वाहतुकीसाठी अंतर व वेळ वाचेल हा दृष्टीकोन ठेवून या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांची होती. त्यानुसार प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता.

या राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने संपूर्ण सर्व्हे करून सादर केलेल्या प्रशासकीय अहवालाला सरकारने मंजुरी दिली आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 7 कोटी 33 लाख रूपयांच्या निधीची उपलब्धता झाल्याने दळवळणाच्या दृष्टीने हा राज्य महामार्ग आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एक वर्षात या मार्गाचे काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी हा मार्ग खुला होणार असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.

नांदूर शिंगोटे, तळेगाव, लोणी आणि कोल्हारपर्यत जोडल्या जाणार्‍या या मार्गाचा मोठा फायदा स्थानिक रहिवाशांना होईल. याकडे लक्ष वेधून ना. विखे यांनी सांगितले, विविध कारणाने नगर- मनमाड मार्गावरची वाहतूक काही वेळा या मार्गावर वळविण्यात येते. त्याचा त्रास स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिंनीना होतो. या मार्गावर वाहतुकीची नेहमीच होणारी कोंडी आणि अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मार्गाचे रुंदीकरण होणे गरजेचे होते. शासनाच्या निर्णयामुळे या मार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या संपून अपघाताचे प्रमाण कमी होईल. गावपातळीवरील विकासाला या रुंदीकरणामुळे दिशा मिळणार असल्याने रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्‍वास ना. विखे पाटील यांनी व्यक्त केला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!