‘नाम’ माणुसकीची चळवळ मकरंद अनासपुरे यांचे प्रतिपादन

0
नाशिक | दि. १० प्रतिनिधी स्वत:साठी प्रत्येक व्यक्ती जगतो. मात्र स्वत:साठी जगताना इतरांसाठी जगत समाजात सकारत्मक दृष्टिकोन पेरण्याचे काम करणे आवश्यक आहे. त्यातून मिळणारे समाधान लाख मोलाचे असते. माणुसकीची ही भावना जपण्यासाठी ‘नाम’ फाऊंडेशन सुरू करण्यात आले असून ही एक सामाजिक चळवळ आहे. ‘नाम’ सुरू केल्यापासून माझ्या दु:खाची परिभाषा बदलली आहे. सोबतच त्यामुळे समाजाकडून देण्यात येत असल्याल्या देवत्वाची भितीही वाटू लागली आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते मकरंंद अनासपुरे यांनी केले.
गोदाघाटावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे दहावे पुष्प गुंफताना ‘नाम फाऊंडेशन आणि सामाजिक भान’ या विषयावर ते बोलत होते. स्व. प्रा. सुरेश मेणे यांच्या स्मृतीनिमित्त आजचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी नरेंद खाडे यांनी नामला २५ हजार रुपयांचा धनादेश दिला.
मकरंद अनासपुरे म्हणाले, ‘नाम’ ही माणसांनी माणुसकीसाठी चालवलेली सामाजिक चळवळ आहे. ज्यांना या चळवळीत चांगुलपणा दिसतो अशी अनेक माणसे ‘नाम’ला हातभार लावत आहे. ही सामाजिक चळवळ अधिक व्यापक आणि बलवान व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच, मात्र ही एक रिले स्पर्धा आपल्या सर्वांना एकमेंकांच्या समन्वयांने, हातात हात घेत पुढे चालालयचे आहे. वयाच्या पंचवीशीत आपले शेतकरी बांधव आत्महत्या करत असतील तर ही आपल्यासाठी लाजिरवानी बाब असून आत्महत्याग्रस्तांना बळ देत त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचे काम ‘नाम’ करत आहे.
नामचा आदर्श घेत अनेक सामाजिक संस्थांनीही विविध समाजोपकारी उपक्रम सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले. अनासपुरे म्हणाले, नामने मागील वर्षी ९० ठिकाणी जलसंधारणाची कामे केली असून ते सर्व ठिकाणे आजही टँकरमुक्त आहेत. यंदा पश्‍चिम महाराष्ट्रातील ३५ ठिकाणी कामे सुरू असून यंत्रसामग्रीची कमतरता असल्याचे त्यांनी सांंंगितले.
पर्यावरण आणि पाणीटंचाईवर बोलताना अनासपुरे म्हणाले, माणूस येथील मालक नसून चालक आहे हे विसरला आहे. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून दिवसेंदिवस समस्या वाढत चालल्या आहेत. पाण्याची पातळी हजार फुटापर्यंत खोलवर गेली आहे. भविष्यात ही स्थिती आणखी गंभीर होणार आहे.
आज वृक्षसंवर्धन आणि पाण्याचा योग्य वापर झाला नाही तर पिढ्यांना आणखी भयंकर प्रश्‍नांचा सामना करावा लागणार असल्याची जाणीवही त्यांनी करून दिली.

हुंडाबंदीचे आवाहन
केवळ हुंडा देवू शकत नसल्याने आजही अनेक विवाह मोडत आहे. हुंडाप्रथा समाजासाठी शाप असून ती मोडीत काढण्यासाठी महिलांबरोबर तरुण मुलांनीही पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी केवळ भाषणबाजी न करता प्रत्यक्ष कृती करण्याचे आवाहन यावेळी अनासपुरे यांनी केले.

‘नाम’चा दुसरा टप्पा
नाम फाऊंडेशनने पहिल्या टप्प्यात शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबिय व पीडितांना मदतीचा हातभार आणि जलसंवर्धनाची अनेक कामे केली. आता दुसर्‍या टप्प्यात शहीद कुटुंबियांना मदतीचा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात शहिदांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत देण्यात आली. दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी सर्व ५० लाख रुपये रक्कम अभिनेते नाना पाटेकर यांनी स्वत: दिली असल्याचे अनासपुरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*