Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणार्‍यांनी आधी आमदार सांभाळावेत

Share

ना. राधाकृष्ण विखे पाटलांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.थोरातांना टोला

शिर्डी (प्रतिनिधी)- आघाडीचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहणार्‍यांनी आपल्या पक्षात किती आमदार राहतील याची आधी दक्षता घ्यावी, असा प्रतिटोला गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांना शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार चांगले काम करीत असून जनतेचा विश्वास सरकारवर आहे. राज्यात लोकसभेला मिळालेला जनाधार विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, असा विश्वास व्यक्त करतानाच मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा यापेक्षा महायुतीचाच होईल, असा दावाही त्यांनी केला.

शिर्डी येथे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरूपोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर श्री साई समाधीचे दर्शन घेतले. पत्रकारांशी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत देशातील आणि राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना पुन्हा संधी दिली. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला मोठे यश मिळाले. सरकारचे चांगले काम सुरु असल्यामुळेच जनतेने महायुतीला पाठबळ दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत यापेक्षा वेगळे निकाल नसतील. 220 जागांचे उद्दीष्ट पूर्ण होईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंचे काम अतिशय चांगले सुरू असून कॉग्रेस आघाडी सरकारला न करता आलेले निर्णय या सरकारने प्राधान्याने घेतले असल्याने लोकांच्या मनात सरकारबद्दलची विश्वासार्हता कायम आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा केलेला दावा फेटाळून लावत ना. विखे पाटील म्हणाले की, जुनेच चेहरे मेअकप करुन पुढे आणल्याने पक्षाची वाढ होईल की अधोगती याचा विचार त्यांनी आधी करावा, अशा शब्दात त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली. नगर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले. विधानसभा निवडणुकीत बाराही आमदार हे महायुतीचेच निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात युतीतील दोन्ही पक्षाकडून मुख्यमंत्री पदाचा दावा केला जात असल्याकडे लक्ष वेधले असता विखे पाटील म्हणाले की, युतीत याबाबत बेबनाव निर्माण होईल म्हणून अन्य मंडळींनी यावर भाष्य करणे टाळले पाहिजे, अशा विधानामुळे कार्यकर्त्यामध्ये निर्माण होणारी संभ्रमावस्था टाळण्यासाठी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनीच यावर बोलणे उचित ठरेल, असे मत विखे यांनी व्यक्त केले.

मागील काँग्रेस आघाडी सरकारला जी कामे करता आली नाहीत त्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्यक्रम देवून सोडविली. जिल्ह्यातील निळवंडे कालव्यांचा प्रश्न असो की, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे वळविण्याचे घेतलेले धोरण ही खर्‍या अर्थाने जिल्ह्यासाठी सरकारची मोठी उपलब्धी आहे. केवळ विखे पाटील यांना श्रेय मिळेल म्हणून मागील आघाडी सरकारने या प्रश्नाचे निर्णय जाणीवपूर्वक प्रंलबित ठेवल्याचा आरोप त्यांनी करतानाच मी यापूर्वी सरकारच्या विरोधात बोललो. मात्र सरकारने प्रत्येक वेळी भूमिका घेत काम केली असल्याचे विखे म्हणाले.

हा तर योगायोग
खा. सुजय विखे व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात हे एकाच विमानातून दिल्लीला जात असल्याबाबत विचारले असता थोरात हे त्यांच्या पक्ष कामासाठी दिल्लीकडे जात असतील व सुजय त्याच्या कामासाठी दिल्लीला गेला आहे. त्यांचे एकाच विमानातून जाणे हा केवळ योगायोगच.

थोरातांना शुभेच्छा…
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्याबद्दल विचारले असता … त्यांना शुभेच्छा! परंतु त्यांच्याकडे असलेले लोक त्यांनी सांभाळावेत. काही लोक पक्षांतर करण्यामागे लागले असून त्यांना चांगली वागणूक देऊन थांबवता आले तर थांबवा, असा खोचक टोला लगावला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!