Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

गोदावरीचा 500 चा कालवा 800 क्युसेकचा होईल : ना विखे

Share

राहाता (तालुका प्रतिनिधी) – निळवंडे कालव्याचा प्रश्न मार्गी लागलाच आहे. त्याचबरोबर गोदावरी कालव्याच्या रूंदीकरणाचे काम दोन वर्षात पूर्ण करून तो कालवा 500 वरून 800 क्युसेक करून या परिसराचा पाणी प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कायमचा सोडवू, असे आश्वासन राज्याचे गृहनिर्णाण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी राहाता येथील जाहीर प्रचार सभांमध्ये दिले.

भाजप-सेना मित्रपक्षाच्यावतीने आयोजीत केलेल्या प्रचार सभेत ना. विखे पाटील बोलत होते. यावेळी राहाता शहरात लोकरूचीनगर, शनिप्रभाग व साई विठ्ठला लाँन्समध्ये या सभा संपन्न झाल्या. अध्यक्षस्थानी गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ होते. यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा, कैलास सदाफळ, सोपानकाका सदाफळ, डॉ. के. वाय. गाडेकर, बाळासाहेब गिधाड, सचिन मेहेत्रे, सागर सदाफळ, डॉ. संतोष मैड, डॉ. गोरे, मुन्ना शहा, सलीम शहा तसेच नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले, या परिसराचा पाणी प्रश्न बिकट असून तो सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. मला विश्वास असून निळवंडे कालव्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. दोन वर्षात निळवंड्याचे पाणी लाभक्षेत्रातील शेवटच्या लाभधारक शेतकर्‍यापर्यंत पोहचेल. तसेच गोदावरी कालव्यांच्या रूंदीकरणाचे कामही येत्या दीड वर्षात पूर्ण करून 500 क्युसेकचा कालवा 800 क्युसेक्स केला जाईल. यासाठी कितीही निधी लागला तो उपलब्ध केला जाईल. पाण्याचे मोठे संकट परिसरावर आहे. या कालव्याचे काम पूर्ण झाल्यावर तो प्रश्न मार्गी लागेल.

शिर्डीत वाया जाणारे रोज 70 लाख लिटर पाणी शुध्दीकरण करून ते चार चार्‍याद्वारे शेतीला पुरविण्यासाठी शिर्डीत 30 कोटीचा प्रकल्प सुरू आहे. पाणी प्रश्नी गेल्या दोन वर्षात न्यायालईन लढाईसाठी 12 कोटी खर्च केले. तरीही तो लढा सुरूच आहे. यापुढील काळातही पाण्यासाठी मोठा संघर्ष करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रीत राहून विक्रमी मतांनी मला विजयी करा. त्याच ताकतीवर आपण आपले प्रश्न सोडवून घेवू. योग्य नियोजनामुळे राहाता तालुका टँकर मुक्त झाला आहे. तालुक्यात अवघे दोन टँकर सुरू आहे तर शेजारच्या तालुक्यात 250 टँकर सुरू आहे याचा त्यांनी विचार करावा, असा टोला त्यांनी नाव न घेता थोरातांना लगावला.

राहाता शहराचा नियोजनबध्द विकास झाला. सर्व कार्यालये, कॉलेज सुविधा उपलब्ध झाले. विमानतळामुळे परिसराला महत्व प्राप्त होत आहे. हा विकास असाच पुढे न्यायचा आहे. मुख्यमंत्री आपल्याबरोबर आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा, बाळासाहेब गिधाड, कैलास सदाफळ, राजेंद्र वाबळे आदींची भाषणे झाली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!