दलित शब्दाच्या वापरासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार

0

रामदास आठवले : नगर जिल्ह्यात दलितांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत व्यक्त केली चिंता

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात दलित समाज बांधवांवर होणार्‍या अन्यायाच्या घटनांची आकडेवारी वाढली आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथिल करण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. सवर्ण समाजाच्या व्यक्तीला तातडीने न्याय मिळतो; परंतु दलितांना न्याय मिळण्यास विलंब होत आहे. दलित शब्दाच्या वापरास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली असून याविरोधात नाराजी व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नगर येथे दिली.

नगर येथे आरपीआय संघटना मजबुतीकरणासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे मंगळवार 11 सप्टेंबर रोजी नगर दौर्‍यावर आले होते. येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुनील साळवे, संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, विजयकांत पोटे, रमेश मकासरे, संभाजी भिंगारदिवे, संजय पगारे, विजयकांत चाबुकस्वार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आठवले म्हणाले, आजही दलितांवरील अत्याचाराच्या घटना सुरूच आहे. सवर्ण समाजाकडून दलितांवर 395 कलम लावले जातात. यामध्ये संबंधीत व्यक्ती आरोपी जर नसेल तरी त्यास जामीन मिळण्यासाठी एक ते दीड महिन्याचा अवधी लागतो. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. याबाबत आढावा घेण्यात येत आहे. अशा घटना होऊ नयेत, त्यांना लगाम बसावा, यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. हे सरकार दलितांविरोधी नाही. सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास कसा साध्य केला जाईल यासाठी प्रयत्नशील आहे.

दलितांवर होणार्‍या अन्यायकारक घटना या दुर्दैवी आहेत. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल केला जावा, यासाठी काही समाजकंटकांकडून प्रयत्न केले जाऊ लागले होते. यामुळे अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल केला जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग केला जाऊ नये व निरपराध व्यक्तीला यामध्ये गोवले जाऊ नये याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. समाजात जातीय सलोखा निर्माण व्हावा यासाठी सवर्ण व दलित समाज बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

दलित अत्याचार विषयवार राजकारण नको
देशात दलितांवर घडत असलेल्या घटनांना राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. यामुळे पीडित व्यक्तीला न्याय मिळण्यास विलंब होतो. सत्ता व सरकार कोणाचे असो; या घटना आजही घडतच आहेत. अशा घटनांचे राजकारण न करता अशावेळी विरोधक, सत्ताधारी, विनाशासकीय संस्था, यांनी एकत्र येत या घटना रोखल्या पाहिजे. गेल्या चार वर्षांत सर्वात गरीब आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काम केले आहे.

आम्ही नक्षलवाद्यांपेक्षा खतरनाक
आम्ही नक्षलवाद्यांपेक्षाही खतरनाक आहोत. पण पोलिसांनी आम्हाला कधी अटक केली नाही. कारण आम्ही जनहित आणि देशहितासाठी काम करतोत. काही दिवसांपूर्वी अटक झालेल्या विचारवंतांविरोधात ते नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याचे पुरावे असल्याचे पोलीस सांगत आहेत. चौकशीतून सत्य समोर येईलच. नक्षलवादी विचारसरणी असणार्‍यांनी आंबेडकरवादी असल्याचा बुरखा पांघरू नये, असे आठवले म्हणाले.

भिडेंच्या अटकेची मागणी
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी संशयाच्या भोवर्‍यात असलेले संभाजी भिडे यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी यासाठी सरकारकडे प्रयत्न करणार असे प्रतिपादन आठवले याची केले. तसेच भिडे यांनी संविधानविरोधी भूमिका बजाविण्याचे काम केले आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. अशा व्यक्तीवर कारवाई केली जावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत असे आठवले यांनी म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

*