शेटे, दाते, भामरे, सोनवणे अपात्र; लवादाचा निर्णय; अंतिम यादी जाहीर

0

नाशिक । दि. 31 प्रतिनिधी
मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणूकीसाठी हरकतींवर लवादाने सोमवारी आपला निर्णय जाहीर केला. यात श्रीराम शेटे, नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे, नंदा सोनवणे या चौघांचे अर्ज बाद ठरवण्यात आले आहे. त्यानंतर निवडणूक मंडळाने विविध पदासाठी 333 पात्र उमेदरांची यादी जाहीर केली. हरकतींवर लवादाकडे अपील करण्याची मुदत संपली असून आता सर्वांचे लक्ष माघारीकडे लागले आहे. गुरुवार (दि. 3 ऑगस्ट) रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत माघारीची अंतिम मुदत आहे.

पॅनल निमिर्र्तीच्या हलचालींना आलेला वेग आणि अर्ज माघारीची जवळ आलेल्या मुदतीच्या पार्श्वभूमिवर मविप्रची निवडणूकीत आता रंग भरू लागले आहे. यापूर्वी 4 उमेदराच्या अर्जावर घेतलेल्या हरकती निवडूक मंडळाने फेटाळून लावल्याने संबधितांनी लवादाकडे अपिल केले होते. यावर लवादाने सोमवारी दुपारी आपला निर्णय जाहीर केला. त्यामुळे चारही उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरले.

दिंडोरी तालुक्यातील ज्येष्ठ संचालक श्रीराम शेटे यांच्या अर्जावर सुरेश डोखळे यांनी हरकत घेतली होती. मात्र ती निवडणूक मंडळासमोर वेळेत पोहोचली नसल्याने डोखळे यांनी लवादाकडे अपील केले होते. यावर निर्णय देताना लवादाने शेटे दुसर्‍या शैक्षणिक संस्थेत पदाधिकारी असल्याने मविप्र संस्थेच्या नियम 18 (6) प्रमाणे बाद ठरत असल्याचे सांगीतले. दरम्यान अशोक पिंगळे यांनी नानासाहेब दाते यांच्या महाविद्यालयीन सेवक सदस्यपदासाठी केलेल्या अर्जावर हरकत घेतली होती.

त्यांची सेवा 5 वर्षांपेक्षा कमी शिल्लक असल्याचे पिंगळे यांनी म्हटले होते. मात्र निवडणूक मंडळाने पिंगळे यांची हरकत फेटाळल्याने पिंगळे यांनी लवादाकडे अपिल केले होते. त्यावर लवादाने दाते यांचा सेवा कार्यकाळ 5 वर्षापेक्षा कमी असल्याने परिशिष्ट (क) नुसार त्यांना अपात्र ठरवले. तर गुलाबराव भामरे व नंदा सोनवणे यांच्या प्राथ. व माध्य. सदस्य पदासाठी केलेल्या अर्जावर सयाजी पाटील आणि केशव शिरसाठ यांनी 5 वर्षांची सेवा शिल्लक नसल्याचे कारण देत हरकत घेतली होती. यावरही लवादाने परिशिष्ट (क) नुसार गुराबराव भामरे आणि नंदा सोनवणे यांना अपात्र ठरवले.

..म्हणून शेटे ठरले अपात्र ..

म्हणून शेटे ठरले अपात्र श्रीराम शेटे हे कादवा साखर कारखाना येथील रा. स. वाघ शिक्षण संस्थेचे विश्वस्त असल्याने त्यांना लवादाने संस्थेच्या नियम 18 (6) प्रमाणे बाद ठरवले. शेटे यांची चौकशी करताना लवादाने म्हटले की, शेटे यांनी रा. स. वाघ शिक्षण संस्थेत 11 एप्रिल 2015 रोजी राजीनाम दिला होता. रा. स. वाघ संस्थेने तो 2 जून 2015 ला स्विकारला. यानंतर रा. स. वाघ संस्थेने 19 नोव्हेंबर 2015 रोजी जाहीर केलेल्या बदल अहवालात शेटे यांचे नाव संस्थेच्या संचालक मंडळात अढळून आल्याने त्यांना बाद ठरवण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान लवादाने दिलेला निर्णय आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया श्रीराम शेटे यांनी ‘देशदूत’ला दिली.

प्रबळ उमेदवार देणार

किमान 5 वर्ष सेवा शिल्लक असणार्‍यांनीच निवडणूक लढवावा हा निर्णय माझ्यासारख्या उमेदरांना समोर ठेवून घेण्यात आला आहे. लवादाने दिलेला निर्णय मला मान्य आहे. मात्र यापुढेही न्याय मार्गाने लढा सुरूच ठेवणार असून विरोधकांसमोर प्रबळ उमेदवार उभार करणार आहे. – नानासाहेब दाते.

LEAVE A REPLY

*