‘मविप्र’मध्ये प्रगती कि समाज विकास आज फैसला

0
राज्यात दुसर्‍या क्रमांकाची शैक्षणिक संस्था म्हणुन लौकीक असलेल्या मविप्र समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुक यंदा खर्‍या अर्थान गाजली. लोकसभा व निवडणुकीची रंगीत तालीम म्हणुन पाहिले गेलेल्या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांत आरोप प्रत्यारोपांच्या तोफांचे बार उडाले. जिल्ह्यातील 13 मतदार केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया होऊन यात सभासदांचे एकुण 92.85 टक्के मतदान झाले असुन सेवकांचे मतदान 93.97 टक्के इतके झाले.

यात सर्वाधिक मतदान चांदवड व देवळा तालुक्यात झाले असुन प्रगती व समाज विकास यांच्यात तुल्यबळ अशा लढतीत आज दोन्ही पॅनलचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त झाले. संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागुन असलेल्या निवडणुकीत मतदारांनी सत्ताधार्‍यांच्या बाजुने कि परिवर्तनासाठी कौल दिला, आज  होणार्‍या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.

मविप्रच्या सरचिटणीस नीलीमा पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रगती आणि सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे व अध्यक्ष प्रताप दादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील समाज विकास पॅनल यांच्यात पारंपारीक पंरतु अतिशय तुल्यबळ लढत झाल्याचे आज झालेल्या मतदानातून बघायला मिळाले. सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यत मतदानाची प्रक्रिया जिल्ह्यातील तेरा मतदान केंद्रावर शांततेत पार पडली.

मविप्रच्या कार्यकारि मंडळातील अध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, सभापती व उपसभापती असे 5 पदाधिकारी, तालुका संचालक 13 आणि सेवक संचालक 3 अशा 21 जागांसाठी आज मतदान झाले. यात तालुका निहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे झाले आहे. (कंसात एकुण मतदान) इगतपुरी 136 (142) 95.77 टक्के 95.77, कळवण – सुरगाणा 319 ( 348) 91.67, चांदवड 681 (691) 98.55, दिंडोरी – पेठ 781 (834) 93.65, नाशिक शहर 744 (877) 84.83, निफाड 2852 (2679) 93.93. नांदगाव 262 (294) 89.12, सटाणा 1316 (1409) 93.40, मालेगांव 713 (770) 92.60, येवला 192 (204) 94.12, सिन्नर 407 (435) 93.56, देवळा 561 (587) 95.57, नाशिक ग्रामिण 630 (704) 89.49 टक्के .

अशाप्रकारे 10, 147 पैकी 9,421 मतदारांनी मतदान केले असुन सभासदाचे 92.85 टक्के मतदान झाले आहे. तर सेवक असलेल्या 464 मतदारांपैकी 436 मतदान केले असुन या गटात 93.97 टक्के मतदान झाले आहे. मतदानात सर्वाधिक मतदान हे चांदवड, इगतपुरी, देवळा, येवला व निफाड तालुक्यात झाले असुन कमी मतदान हे नांदगांव, नाशिक शहर व नाशिक ग्रामिण मध्ये झाले आहे.

मविप्रचे मुख्यालय असलेल्या गंगापूररोडवरील शिवाजीनगर अर्थात के. टी. एच. एम. कॉलेज कंपाऊड परिसरातील अभिनव बालविकास मंदीर मराठा हायस्कुल आणि केआरटी महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर आज सकाळी 8 वाजेपासुन मतदानास प्रारंभ झाला.

याठिकाणी नाशिक ग्रामीण, नाशिक शहर आणि सेवक असे तीन मतदान केंद्र असल्याने प्रगती व समाज विकास पॅनलच्या नेते, उमेदवार व समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. याठिकाणी प्रगती पॅनलच्या नेत्या श्रीमती पवार, समाज विकास पॅनलचे अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्यासह दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी सकाळी लवकर मतदान केल्यानंतर याठिकाणी प्रवेशद्वाराजवळ थांबून मतदारांना आवाहन केले. याठिकाणी दोन्ही पॅनल आणि सेवकांचे पॅनलचे मंडप टाकण्यात येऊन येणार्‍या मतदारांना मतदार क्रमांकासह ओळखपत्रांची माहिती देण्याचे काम समर्थकांकडुन सुरू होते. सकाळच्या सत्रात याठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

एका मतदाराला पदाधिकारी निहाय व तालुका निहाय मतदान करावे लागत असल्याने बराच वेळ लागत असल्याने गर्दी वाढत गेली. मात्र दुपारी 2 वाजेपर्यत निम्म्यावर मतदान झाल्याची माहिती देण्यात आली. बहुतांशी तालुक्यात मतदानाचा वेग कायम राहिल्याने सर्वच ठिकाणी 85 टक्कयांच्यावर मतदान गेले. काही ठिकाणी कमी मतदार असल्याने मतदान केंद्र कर्मचार्‍यांना मतदारांची वाट पाहावी लागली.

LEAVE A REPLY

*