मविप्र निवडणूक : दोन्ही पॅनलचे उमेदवार आज जाहीर होणार

0

नाशिक । दि. 2 प्रतिनिधी
मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी माघारीची अंतिम मुदत उद्या दुपारी 4 पर्यंत आहे. यंदा इच्छुकांची संख्या चारशेहून अधिक असल्याने आणि अद्याप केवळ 11 उमेदवारांनी माघार घेतल्याने उद्या किती उमेदवार निवडणूक रिंगणातून मागे वळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनेक जण पॅनलची उमेदवारी मिळण्याची वाट पाहत असल्याने माघारीचे प्रमाण कमी असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने पॅनलप्रमुखांची डोकेदुखी कमी होण्याच्या उद्देशाने माघारीची मुदत संपल्यानंतर दोन्ही पॅनल आपले उमेदवार जाहीर करणार असल्याचे समजते.

मविप्रसाठी अर्ज माघारीची उद्या अंतिम मुदत आहे. मात्र मैदानात इच्छूकांची संख्या अजूनही मोठी असल्याने उद्या अनेक जण माघार घेण्याची शक्यता आहे. काहीजण पॅनलमध्ये आपली वर्णी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान मंगळवारी 1 तर बुधवारी 10 उमेदवारांनी माघार घेतली.

निवडणुकीसाठी पदाधिकारी आणि सर्वच तालुका संचालकपदांसाठी अनेक जण इच्छूक आहेत. परिणामी उमेदवारी देताना दोन्ही पॅनलच्या उमेदवरांचा कस लागणार आहे. प्रत्येक पॅनलकडून 21 याप्रमाणे 42 जणांनाच पॅनलची उमेदवारी मिळणार असल्याने अनेकांच्या पदरी निराशा पडणार आहे.

त्यामुळे इच्छूकांना विविध प्रलोभने देवून तर काहींचा विविध मार्गांनी समज काढण्याचा प्रयत्न दोन्ही पॅनलचे नेते करत असल्याची चर्चा सुरू आहे. कमीत-कमी इच्छूक नाराज व्हावेत या उद्देशाने अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर दोन्ही पॅनल आपले उमेदवार जाहीर करणार असल्याचे समजते.

यांची माघार
नारायण पवार (चिटणीस, उपसभापती), चंद्रभान बोरस्ते (सरचिटणीस), अश्विनी कोतवाल (सटाणा संचालक), नानाजी देसले (प्राथ. व माध्य. संचालक), शंकर धनवटे (नाशिक तालुका), आनंदराव घोटेकर (निफाड), विशाल सोनवणे (सटाणा), शंकरराव हांडगे (नाशिक शहर), विलास मत्सागर (निफाड), विनायक खालकर (निफाड).

न्यायालयात आज सुनावणी
महाविद्यालयीन सेवक सदस्यपदासाठी नानासाहेब दाते आणि प्राथमिक व माध्यमिक सेवक सदस्य संचालकपदासाठी गुलाबराव भामरे व नंदा सोनवणे यांनी दाखल केलेल्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या.

निवडणूक मंडळाने या हरकती फेटाळ्यानंतर हरकतदारांनी लवादाकडे धाव घेतली. लवादाने वरील तिन्ही उमेदवारांचा सेवा कार्यकाळ 5 वर्षापेक्षा कमी असल्याचे कारण देत तिघांचेही अर्ज बाद ठरवले होते.

लवादाच्या निर्णयाविरोधात नानासाहेब दाते, गुलाबराव पाटील आणि नंदा सोनवणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून आज माघारीच्या अंतिम दिवशीच सुनावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

*