घोटीत प्रचाराचा शुभारंभ; संस्थेतील एकाधिकारशाही मोडित काढा : अ‍ॅड. ठाकरे

0

घोटी । मविप्र संस्थेचा कारभार एकाच व्यक्तीच्या हाती केंद्रित झाला आहे. ही एकाधिकारशाही मोडित काढून संस्थेचे खासगीकरण रोखण्यासाठी सभासदासमोर ही निवडणूक म्हणजे एक मोलाची संधी आहे. संस्थेत शालेय प्रवेश, बांधकाम, जमीन खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. सभासदांचे हित अबाधित राहण्यासाठी व संस्थेच्या प्रगतीसाठी सभासदांनी समाज विकास पॅनेलला पाठबळ द्यावे, असे आवाहन पॅनेलचे नेते व सरचिटणीसपदाचे उमेदवार अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले.

मविप्र निवडणुकीत समाज विकास पॅनेलच्या इगतपुरी तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ आज घोटी येथे करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. ठाकरे बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी संचालक पांडुरंग वाजे होते. सत्ताधारी गटावर हल्लाबोल करताना अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी संस्थेत होत असलेल्या गैरकारभारावर जोरदार टीकास्र सोडले. पाच वषार्ंत संस्थेत भ्रष्टाचाराने कळस गाठला असून संचालक मंडळ नाममात्र असून एकाच व्यक्तीची हु़कूमशाही सुरू आहे. या एकाधिकारशाहीमुळे संस्थेचा कारभार धोक्यात आला असून सभासदाच्या हिताला बाधा पोहोचली आहे. समाज विकास पॅनेलचे उमेदवार स्वच्छ व निष्कलंक असून आमच्या हाती सत्ता आल्यास सभासदांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मोफत प्रवेश व नोकरी, विनाअनुदानित सेवकांना दुप्पट वेतन, सभासदहितासाठी विशेष कल्याण योजना राबवल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यानंतर माजी आमदार नानासाहेब सोनवणे, शिवराम झोले, माजी सभापती संपत काळे, आनंदराव सहाने, अर्जुन जाधव, दशरथ पागेरे, कचरू शिंदे आदींनी मार्गदर्शन करून समाजविकास पॅनेलला निवडून देण्याचे आवाहन केले. प्रसंगी अशोक जाधव, सुनील जाधव, संजय गोवेर्धन,े बी. डी. पाटील, भाऊराव जाधव, दिलीप जाधव, विठोबा गव्हाणे यांच्यासह तालुक्यातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्ताधार्‍याकडून अपमानास्पद वागणूक : सोनवणे
संस्थेतील भ्रष्टाचाराला विरोध केल्यामुळे ज्येष्ठ पदाधिकार्‍यांना अपमानास्पद वागणूक देण्यात येत आहे. पदाधिकार्‍याना सन्मान देण्यासाठी आणि संस्थेच्या विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा देईन असे भावपूर्ण उदगार विद्यमान अध्यक्ष माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी काढले. समाजविकास पॅनलच्या सटाणा येथील प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी अ‍ॅड. नितीन ठाकरे म्हणाले, सत्ताधार्‍यांनी संस्थेचा वापर वैयक्तिक स्थार्थासाठी केला. जिल्हा बाहेरच्या सत्ता केंद्रांचे वर्चस्व झुगारून टाकण्यासाठी, शैक्षणिक गुणवत्ता जोपासणारी प्रगतिशील संस्था म्हणून नावारूपाला यावी यासाठी समाजविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी सभासद, हितचिंतक यांनी ताकद उभी करावी असे आवाहन अ‍ॅड. ठाकरे यांनी केले. सभेला रवींद्र पगार, दिलीप दळवी, बाजीराव तुकाराम पवार यांच्यासह सटाणा, कळवण परिसरातील सभासद, सेवक, हितचिंतक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*