पोलिसांच्या वरदहस्तामुळे मुसळगावला वेश्याव्यवसायासाठी अल्पवयीन मुलींची तस्करी

0

नाशिक । दि. 28 प्रतिनिधी
नाशिक येथील तरुणाशी विवाहबद्ध झालेल्या एका बांगलादेशी तरुणीचे अपहरण करून तिला वेश्या व्यवसायासाठी सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे डांबून ठेवण्यात आल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले.

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मुसळगावप्रश्न ऐरणीवर आला आहे. मुसळगाव हे बांंगलादेशी मानवी तस्कारीचे केंद्र बनले असून या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने तस्करीमार्गे बांगलादेशी तरुणींना आणून त्यांची वेश्या व्यवसायासाठी देशभर विक्री करणारे रॅकेट कार्यरत असल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या हस्तक्षेपाने डांबून ठेवलेल्या बांगलादेशी तरुणीची सुटका झाली असली तरी यामुळे बांगलादेशी मानवी तस्करीच्या रॅकेटवरही याने प्रकाश पडला आहे.

मुसळगाव येथे शेकडोंच्या संख्येने बांगलादेशी वेश्या आहेत. यामध्ये 18 वर्षांआतील मुलींची संख्याही लक्षणीय आहे. तसेच 200 पेक्षा अधिक बांगलादेशी दलाल कार्यरत आहेत.

तरच महिला, मुली सुरक्षित
मुसळगावसह जिल्हाभरातील शहरांमध्ये हा अनैतिक व्यवसाय सुरू आहे. बहुतांश ठिकाणी यास स्थानिक पोलिसांचे सहकार्य लाभत असल्याने तो फोफावतो आहे. काही रुपयांसाठी पोलीस याकडे दुर्लक्ष करतात तसेच पाठबळ देतात. परिणामी यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार होऊन व त्यांना या व्यवसायात जबरदस्तीने आणण्याचे प्रकार होत आहेत. पोलिसांनी अशा व्यवसायांना थारा दिला नाही तर असे व्यवसाय बंद पडून मुलीही सुरक्षित होतील. परंतु पोलिसांनी मनावर घेतले तरच..

या सर्वांना संरक्षण देण्याचे काम येथील पोलीस करत आहेत. यासाठी दरमहा लाखो रुपयांचा हप्ता सिन्नर, एमआयडीसी पोलिसांना दिला जात असल्याची चर्चा आहे.

यामुळे या संपूर्ण परिसरावर हे दलाल व त्यांनी पाळलेल्या गुंडांचे राज्य आहे. याचा त्रास मुसळगाव तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांना तसेच येथील उद्योजकांनाही मोठ्या प्रमाणावर होत आहे.

मात्र गुंडांची दादागिरी आणि त्यांना साथ देणारे पोलीस यांच्यामुळे ग्रामस्थांचे काहीच चालत नसल्याचे येथील ग्रामस्थांनी  देशदूतशी बोलताना सांगितले.

दलालांचे वर्चस्व, पोलिसांची मदत यामुळे मुसळगाव वेश्या व्यवसायासाठी राज्यात प्रसिद्ध झाले आहे. यामुळे या ठिकाणी येणार्‍या अंबट शौकिनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

अंबट शौकिनांची मागणी लक्षात घेता अधिकाधिक अल्पवयीन मुलींना या व्यवसायात जबरदस्तीने आणण्याची स्पर्धा दलालांमध्ये लागली आहे. परिणामी बांगलादेशासह स्थानिक पातळीवरील व जिल्ह्यातील गरीब घरातील मुली तसेच फसवल्या गेलेल्या मुलींनाही या व्यवसायात उतरवले जात असल्याचे वास्तव आहे.

या व्यवसायाची पाळेमुळे मुसळगावपासून नाशिक शहर, ओझर, पिंपळगाव बसवंत, मालेगाव यासह विविध मोठ्या शहरांमध्ये पसरली आहेत. या सर्व ठिकाणी मुसळगाव येथून मुली पुरवल्या जात असल्याचे वास्तव आहे.

LEAVE A REPLY

*