Video : मुसळगाव सेक्स रॅकेटमधील नानी अखेर अटकेत; माध्यमांसमोर लपविला चेहरा

0

नाशिक (प्रतिनिधी) ता. १४ : बांग्लादेशमधून अल्पवयीन मुलींची तस्करी करून त्यांना वेश्यव्यवसायात ढकलले जाण्याचे वास्तव त्यातील पीडितेने कॅमेऱ्यासमोर मांडल्यानंतर मोठी खळबळ उडाली.

या प्रकरणी मुसळगाव येथे वेश्या व्यवसायाचा वर्षानुवर्षे अड्डा चालविणाऱ्या नानी ऊर्फ मंगल नंदकिशोर गंगावणे हिला आज सकाळी अखेर पोलिसांनी अटक केली.

ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या प्रकरणी आतापर्यंत नानीसह तिचा मुलगा विशाल नंदकिशोर आणि सोनू नरहरी देशमुख यांना काल रात्रीच ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर पीडित मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्ह्यासह पीटा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पीडित मुलीची मावशी माजिद अब्दुल, रा. बांग्लादेश यांच्यासह अन्य ३ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण गुन्हा दाखल झालेल्यांची संख्या ७ झाली आहे. दरम्यान पीडितेची मावशी माजिद, जिनेच या मुलीला या व्यवसायात आणले ती फरार झाल्याचे सांगण्यात आले.

आज दुपारी पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकरणी सिन्नर पोलिसांची भूमिका पहिल्या पासून वादग्रस्त आणि संशयाच्या सावटाखाली राहिली असल्याचे पीडितेच्या जबावातून आढळले. त्यामुळे दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करू असे आश्वासनही श्री दराडे यांनी यावेळी दिले.

पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी दिलेली माहिती

दरम्यान या प्रकरणाला अनेक पैलू असून, अल्पवयीन मुलींची फसवणूक व अत्याचारासह भारतात अवैध प्रवेश, अवैध मानवी तस्करी, बनावट पासपोर्ट व आधार कार्ड बनविणे असे अनेक पैलू असल्याचे लक्षात आल्याने त्यादिशेने तपास केला जाणार आहे.

 

LEAVE A REPLY

*