Thursday, May 2, 2024
Homeनगरतोंडात तणनाशक औषध ओतून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

तोंडात तणनाशक औषध ओतून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

2 फेब्रुवारी 2022 रोजी नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे शेतजमिनीच्या वादातून घडलेल्या एका प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार पाच जणांवर तोंडात तणनाशक औषध ओतून एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

- Advertisement -

याबाबत संपत अशोक मते (वय 33) रा. पानेगाव ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यावरुन भाऊसाहेब पंढरीनाथ नवगिरे, राजेंद्र भाऊसाहेब नवगिरे, चंद्रकला भाऊसाहेब नवगिरे, बाळासाहेब भाऊसाहेब नवगिरे व दिपाली बाळासाहेब नवगिरे या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले की, फिर्यादीचा आरोपींशी 2019 पासून जमिनीचा वाद आहे. 2 फेब्रुवारी 2022 रोजी वरील पाचही आरोपी फिर्यादीच्या पानेगाव येथील गट नंबर 220/1/ई या मिळकतीमध्ये आले. त्यांनी फिर्यादीस क्रुरपणे मारहाण करुन फिर्यादी हा त्याच्या गव्हाच्या शेतात पाणी देण्यासाठी आला असता आरोपी चंद्रकला भाऊसाहेब नवगिरे व राजेंद्र भाऊसाहेब नवगिरे व दिपाली बाळासाहेब नवगिरे यांनी फिर्यादीला खाली पाडले व ‘तू आमच्या विरुद्ध नेवासा कोर्टात दावे करतो काय?’ असे म्हणून तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून भाऊसाहेब पंढरीनाथ नवगिरे व बाळासाहेब भाऊसाहेब नवगिरे यांनी त्यांच्या खिशातून विषारी तणनाशकाची (गोल) बाटली काढली. भाऊसाहेब याने माझा जबडा धरुन बाळासाहेब नवगिरे याने माझ्या तोंडामध्ये वरील तणनाशकाची बाटली उघडून टाकली. मला त्रास होवू लागला व मी बेशुद्ध पडलो.

त्यावेळी साक्षीदार अचानक तिथे आले असता आरोपींनी पळ काढला. साक्षीदार यांच्या मदतीने फिर्यादी यांना प्रथम मांजरी येथील खासगी दवाखान्यात व त्यानंतर नोबेल हॉस्पीटल (अहमदनगर) येथे उपचारासाठी दाखल केले. तिथे तीन दिवस उपचार घेतले. त्यानंतर फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता आरोपीने पोलीस ठाण्यात फिर्याद घेवू दिली नाही. आरोपीच्या सांगण्यामुळे पोलिसांनी जबाबही घेतला नाही. फिर्यादी घरी आल्यावर वरील सर्व आरोपींनी आम्ही तुला जिवंत ठार मारु अशी धमकी दिली. 11 एप्रिल 2022 रोजी रजिस्टर पोस्टाने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याची पोहच आली असतानाही सोनई पोलीस ठाण्याने फिर्याद घेतली नाही. त्यामुळे मेडिकल रिपोर्ट, दिलेली फिर्याद यांच्या नकला हजर केल्या. औरंगाबाद हायकोर्ट यांचे निर्देशाप्रमाणे सदर केस क्रिमीनल प्रोसिजर कलम 156 (3) प्रमाणे सोनई पोलीस ठाण्यात तपासाकरीता पाठविण्याची विनंती करण्यात आली.

त्यावरुन सोनई पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 314/2022 भारतीय दंड विधान कलम 307, 143, 147, 148, 149, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या