अत्याचार करून प्रेयसीच्या खुनानंतर प्रियकराची आत्महत्या

0
कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील दहिगाव बोलका येथील 30 वर्षीय युवतीबरोबर प्रेमसबंध निर्माण करून व तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केल्यानंतर प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना शुकवारी मध्यरात्री घडली. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संबंधिताविरोधात अत्याचार व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी दशरथवाडी संवत्सर गोदावरी डावा कालव्यावरील पुलाखाली 30 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळला. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
संदीप संजय कांबळे याचा मृतदेह संवत्सर रेल्वे पुलाखाली आढळून आला. याबाबतची खबर रेल्वे गँगमन मोहम्मद मक्सूद आलम याने पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तिच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी संदीप संजय कांबळे याचे मुलीबरोबर प्रेम संबंध होते. त्याने तिच्यावर अत्याचार करुन तिचे डोके दगडाने ठेचून तिला ठार मारले.
त्यानंतर स्वत: रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्चना करपुडे करीत आहेत. मुलीवर अत्याचार करून आरोपीने तिचा खून केला व रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे मुलीच्या आईनेच नमूद केले आहे.
परंतु कांबळे याच्या डोक्याला पाठीमागून मार लागलेला आहे. त्यामुळे त्याने आत्महत्या केलेली नसल्याची शक्यता व्यक्त होत आहे. संदीप कांबळे याच्या डोक्यास मागील बाजूस गंभीर दुखापत झाली असल्याने या प्रेमीयुगलाची हत्या करण्यात आल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

 

LEAVE A REPLY

*