शिवसेना पदाधिकार्‍याची निर्घृण हत्या

कोपरगाव(तालुका प्रतिनिधी) – कोपरगाव शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुरेश (उर्फ भावड्या) शामराव गिरे(40 वर्ष)यांची राहत्या घरात घुसून सात ते आठ अज्ञात हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून व कत्ती,चॉपरच्या सहाय्याने हत्या केल्याची घटना तालुक्यातील भोजडे येथे रविवार दि.15 मार्च रोजी रात्री 7 ते 8 वाजेच्या सुमारास घडली आहे.

रविवार दि 15 मार्च रोजी रात्री 7 ते 8 वाजेच्या सुमारास मयत सुरेश गिरे हे भोजडे येथील आपल्या घरात कुटुंबा समवेत असताना त्यांच्या घरात अज्ञात सात ते आठ हल्लेखोरांनी घुसून त्यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या.ते मागील दाराने बाहेर शेतात पळाले असता मक्याच्या शेतात हल्लेखोरांनी त्यांच्यावर कत्ती व चॉपरच्या सहाय्याने वार केल्यामुळे ते जागीच ठार झाल्याची घटना घडली असून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

सदर घटनेची माहिती वार्‍यासारखी पसरताच शिवसैनिकांसह परिसरातील नागरिकांनी भोजडेच्या दिशेने धाव घेतली.याघटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रात्री उशिरा कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.यावेळी ग्रामीण रुग्णालयात शिवसैनिकांनी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *