महिलेच्या खून प्रकरणी एकास जन्मठेप

0

कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- शिर्डी येथील हॉटेल साईप्रिया हॉटेल मालक राजा मांडवा यांची पत्नी गिरीजा हिचा सहा वर्षापूर्वी चौघांनी कट रचून गळा आवळून खून केल्याप्रकरणी कोपरगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्र.2 ए.पी. रघुवंशी यांच्यापुढे चालू असलेल्या खटल्यातील वासू उर्फ श्रीनिवासू मल्लिपुडी रा. आंध्रप्रदेश या आरोपीस दोन गुन्ह्यात अनुक्रमे जन्मठेप व 10 वर्षे कारावासाची शिक्षा झाली असून दोन्ही शिक्षा एकाचवेळी भोगावयाची आहे.
तब्बल सहा वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला. अन्य 2 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली आहे. एक आरोपी फरार असल्याची माहिती सरकारी वकील अशोक वहाडणे यांनी दिली.
या गुन्ह्याचा तपास गुन्हा अन्वेषण शाखेचे तत्कालिन पोलीस निरीक्षक पी.एन. उगले यांनी करून त्यात वासू उर्फ श्रीनिवासू मल्लिपुडी राजू नडबिगेरी, नल्लेश नडबिगेरी व देवराज मढिवाल यांना चौकशी अंती आरोपी करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले. दरम्यान मढिवाल वगळता तिघांना अटक केली होती व मढिवाल तेव्हापासून फरार आहे. सदर खटल्याचे कामकाज न्यायमूर्ती ए.पी. सूर्यवंशी यांच्यापुढे चालले.
सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. सुद्रिक (अहमदनगर) व कोपरगाव येथील सरकारी वकील अशोक वहाडणे यांनी बाजू मांडली. याप्रकरणी महत्त्वाचे 12 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादीची मावशी रजनी अमरनाथ मल्लीनेडी हीची साक्ष महत्त्वाची ठरली. मावशी रजनी शेजारीच राहत असल्यामुळे तीने आरोपींना ओळखले होते.
वैद्यकिय अहवाल परिस्थितीजन्य पुरावा व इतर साक्षीदार, फिर्यादीचे जबाब व सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. सुद्रिक व वहाडणे यांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय नं.2 ए. पी. रघुवंशी यांनी आरोपी वासू उर्फ श्रीनिवासू मल्लिपुडी रा. आंध्रप्रदेश यास कलम 302 अन्वये जन्मठेपेची शिक्षा व रु 5 हजार दंड कलम 397 अन्वये 10 वर्षे कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यातील एक आरोपी फरार आहे. तर अन्य दोन आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटल्याची माहिती अ‍ॅड. ए.एल. वहाडणे यांनी दिली.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी – राजा सुब्बाराम मांडवा यांचे शिर्डी येथे हॉटेल साईप्रिया नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये व मांडवा यांच्या घरी शौचालयाचे व बाथरुमचे काम करण्याच्या बहाण्याने वासू उर्फ श्रीनिवासू मल्लिपुडी राजू नडबिगेरी, नल्लेश नडबिगेरी व देवराज मढिवाल हे गुन्हा करण्यापूर्वी काही दिवस काम करीत होते. दि. 13 ऑगस्ट 2011 रोजी सर्व आरोपी हे गुन्हा करण्याच्या इराद्याने संगनमत करून फिर्यादीच्या घरी आले. घरात शिरले व फिर्यादी राजा मांडवा यांच्या कपाटातील सोन्याचे दागिने, चांदीची भांडी व रोखरक्कम असा ऐवज चोरून नेला. हे त्यांची पत्नी गिरीजा मांडवा यांच्या लक्षात आल्याचे आरोपींना समजल्यानंतर त्यांनी त्याच दिवशी गिरीजा मांडवा हिचा काथ्याच्या दोरीने गळा आवळून व हाताने गळा दाबून खून केला. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भादंवि. कलम 302, 397 अन्वये गुन्हा दाखल झाला. 

LEAVE A REPLY

*