शेवगाव हत्याकांड : वैद्यकीय तपासणीत अल्ताफ भोसले सज्ञान

0

दोन्ही आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

शेवगाव (प्रतिनिधी) – शहरातील विद्यानगर भागात राहणारे माजी सैनिक अप्पासाहेब हरवणे यांच्यासह कुटुंबातील चार जणांची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेला अल्ताफ भोसले हा वैद्यकिय चाचणीत सज्ञान असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे अल्ताफ भोसले याला व हत्याकांडातील मुख्य आरोपी रमेश भोसले या दोघांना न्यायालयाने 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या हत्याकांडातील पसार असलेल्या दोन आरोपींचा अद्याप पोलीस शोध घेत असून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम अद्याप बाकी असून पोलीस कसून तपास करत आहेत.शेवगाव शहरातील विद्यानगर भागात राहणारे माजी सैनिक अप्पासाहेब हरवणे यांच्यासह पत्नी सुनंदा, मुलगी स्वप्नाली व मुलगा मकरंद या चौघांची हत्या झाल्याची घटना रविवार दि. 18 जून रोजी उघडकीस आली होती.

या घटनेचा विविध अंगांनी तपास केल्यानंतर 28 जून रोजी दोन आरोपींना अटक केली होती. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती. त्यानंतर अटकेत असलेल्या अल्ताफ भोसले याच्या वकिलाने आधार कार्ड व जन्म दाखला न्यायालयात सादर करून तोही अल्पवयीन असल्याचे सांगितले होते. मात्र या जन्म पुराव्यावर तपासी अधिकारी दिलीप पवार यांनी हरकत घेत आरोपीची वैद्यकिय तपासणी करण्याची परवानगी मागितली होती.

यावरून न्यायालयाने आरोपीच्या वकिलाने सादर केलेले जन्म पुरावे फेटाळून लावत अल्ताफ भोसले याची जिल्हा रुग्नालयात वैद्यकिय तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यावरून तपासी अधिकारी दिलीप भोसले यांनी आरोपी अल्ताफ भोसले याची बुधवारी वैद्यकिय तपासणी करून काल न्यायालयात तपासणी अहवाल सादर केला. अल्ताफ भोसले याचा वैद्यकिय अहवाल न्यायालयाने तपासला असता तो सज्ञान असल्याचे स्पष्ट झाले.

या हत्याकांडातील मुख्य आरोपी रमेश भोसले याची पोलीस कोठडी काल संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला व वैद्यकिय अहवालात सज्ञान असलेला आरोपी अल्ताफ भोसले या दोघांना न्यायालयाने 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अल्ताफ भोसले याने अल्पवयीन असल्याचा दावा केल्यानंतर पोलिसांपुढे नवा पेच निर्माण झाला होता. यामुळे तो सज्ञान असल्याबाबत पुरावे गोळा करण्यात बराच कालावधी गेल्याने तपास कामात अडथळे आल्याने पसार असलेल्या दोन आरोपी व चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात अडचणी येत होत्या. आता या दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याने तपास कामात वेग येणार आहे. हत्याकांडातील उर्वरीत दोन आरोपींना लवकरच अटक करून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात यश येईल असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*