शेवगाव हत्याकांड : मारेकरी नेवाशात गजाआड

0

आरोपींनी पोलिसांवर गोळी झाडली, गलोलीतून दगडेही मारली

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – शहरातील विद्यानगर येथे राहणारे माजी सैनिक अप्पासाहेब हरवणे यांच्यासह चार जणांची हत्या करणार्‍या दोन आरोपींना नेवाशातील बाभुळखेडा शिवारात अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले आहे. त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली असून तीन आरोपी पसार झाले आहेत.

दरोड्याच्या उद्देशाने आरोपी हरवणे यांच्या घरात शिरले होते. मात्र आप्पासाहेब हरवणे यांची मुलगी स्वप्नाली ही जागी असल्याने तिने आरडाओरड केल्याने हे हत्याकाड झाल्याचे आरोपींनी कबुलीजबाब दिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शहरातील विद्यानगर भागात शनिवार दि. 17 रोजी रात्री आप्पासाहेब हरवणे, सुनंदा हरवणे, मकरंद हरवणे, स्नेहल हरवणे या एकाच कुटूंबातील चौघांची हत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती. मारेकर्‍यांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या चार पथके व शेवगाव पोलीसांची दोन पथके असे सहा पथके या हत्याकांडाचा तपास लावत होते.

तपासात पोलिसांना काहीच हाती लागत नसल्याने माहिती देणार्‍यास 50 हजारांचे बक्षिस पोलीसांनी जाहीर केले होते. तपास कामात पोलिसांनी औरंगाबाद, बीड येथील पोलीसांचीही मदत घेतली होती. मारेकर्‍यांचा तपास सुरू असताना रविवार दि. 25 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला आरोपींबाबत माहीती मिळाली.

या माहितीच्या आधारे नेवासा तालुक्यातील बाभुळखेडा ते जळका फाटा या रस्त्यालगत आरोपींचा शोध घेत असताना सुरेश विधाटे यांच्या शेताजवळ चार संशयीत इसम दोन मोटारासायकलवर भरधाव जात असताना आढळून आले. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता यातील एकाने पोलीसांच्या दिशेने गावठी कट्टा रोखत एक गोळी झाडली. परंतु प्रसंगवधानाने कोणालाही इजा झाली नाही. आणि सदर आरोपी पसार झाले. त्यांनतर लगेचच पुन्हा एका मोटारसायकलीवर दोन इसम त्या दिशने आले. त्यांना पोलीसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असताना त्यांना हुलकावणी देवून पळून जाण्याच्या प्रयत्नात त्यांची मोटारसायकल घसरुन पडली.

अशा परिस्थीतीत ही पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता उमेश हरसिंग भोसले (रा. दिघी, ता. नेवासा) यास पोलिसांनी पकडले. तर दुसरा आरोपींने हातातील लोखंडी धारदार शस्त्र पोलीसांना फेकून मारले. व जवळच असलेल्या उसात लपवून बसला. त्याला पकडण्यासाठी अधिकारी व पोलीसांनी उसाला चहुबाजूने वेढा घातला आणि काही वेळातच त्याला जेरबंद केले.

पोलिसांनी उमेश हरसिंग भोसले (रा. दिघी, ता. नेवासा) व अल्ताफ छगन भोसले (रा. मुकींदपूर, ता. नेवासा) या दोन आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक केलेले दोन आरोपी व त्यांचे साथीदार हे दरोड्याच्या उद्देशाने शेवगाव शहरात आले होते. त्यांनी नेवासा रोडवरील एका मोकळ्या शेतात आपले चारचाकी वाहन लावून विद्यानगर भागात प्रवेश केला.

चोरीच्या उद्देशाने फिरत असताना त्यांनी आप्पासाहेब हरवणे यांच्या घराच्या जिण्यावरून चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केला. घरात कोणीतरी आल्याचे लक्षात येताच माजी सैनिक आप्पासाहेब हरवणे यांना जाग आली. त्यांनी या चोरट्यांना प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांना लोखंडी टॉमीने फटका लावला. या फटक्याने आप्पासाहेब यांचा मृत्यू झाला.

याचवेळी आप्पासाहेब हरवणे यांचा मुलगा मकरंद हा जागा झाला असता त्याच्यावरही चाकूने हल्ला केला. हा गोंधळ पाहून मुलगी स्वप्नाली हिने या चोरट्यांबरोबर चांगलीच झटापट केली. तीच्यावरही लोखंडी टॉमी व चाकूने हल्ला करून ठार केला. अशाच प्रकारे पत्नी सुनंदा यांचीही हत्या करण्यात आला.

या चोरट्यांनी घरात उचकापाचक न करता मयताच्या अंगावरील सोन्याची दागिनेे चोरून नेले. पहिल्याच झटापटीत आप्पासाहेब हरवणे यांचा हत्या झाल्याने पळून जाण्याऐवजी आरोपींनी घरातील इतर सदस्यांचाही हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबूली आरोपींनी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेत आणखी तीन आरोपींचा सहभाग असून त्यांची माहिती घेण्यात येत आहे. दरम्यान या आरोपींनी नाशिक जिल्हायातील नांदगाव येथेही शुक्रवार दि. 24 रोजीच्या रात्री तीन ठिकाणी दरोडे टाकल्याची कबुलीही दिली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

या तपासकामी जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक रोहीदास पवार, श्रीरामपुर विभागाचे घनशाम पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील, राजकुमार हिंगाले, श्रीधर गुठ्ठे, सुहास हट्टेकर यांनी विशेष प्रयत्न केले.

अशी दिली कबुली…  चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश….. आप्पासाहेब हरवणे यांनी प्रतिकार केल्याने त्यांच्या डोक्यात टॉमीने प्रहार…..  मुलगा मकरंद जागा झाल्याने त्याच्यावरही चाकूने वार……. मुलगी स्वप्नालीचा जोरदार प्रतिकार, तिलाही टॉमी, चाकूने हल्ला……..  पत्नी सुनंदालाही संपविले………  पुरावा नष्ट करण्यासाठी एकामागून एक सदस्यास संपविले…..  या सर्वांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून पलायन.

 

LEAVE A REPLY

*