सुरज जाधव खूनप्रकरणी एकास अजन्म कारावास; चौघांना दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

0
संगमनेर (प्रतिनिधी)- एकतर्फी प्रेमाला विरोध केल्याचा राग येवून ढोलेवाडी येथे राहणार्‍या एका युवकाचा धारधार शस्त्राने वार करुन खून केल्याच्या गुन्ह्यातील एका आरोपीस अजन्म कारावास तर चौघांना दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे.
शहरातील ढोलेवाडी येथे राहणारा सुरज कैलास जाधव (वय 21) असे मयताचे नाव आहे. दरम्यान 20/8/2014 रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास सुरज कैलास जाधव, निलेश रमेश ढोले व योगेश रमेश ढोले हे तिघे मोटारसायकलहून मित्राचा अंत्यविधी आटोपून येत होते.
त्या दरम्यान बी. एड. कॉलेजजवळ विनायक गणपत भोर, सागर शंकर ढोले, मुकूंदा भरत ढोले, प्रसाद भारत ढोले, ज्ञानेश्‍वर मच्छिंद्र ढोले व आणखी दोघे (सर्व रा. ढोलेवाडी) यांनी या तिघांना अडविले. त्यांच्यात बाचाबाची झाली. बाचाबाचीचे हाणामारीत रुपांतर झाले.
याच दरम्यान विनायक भोर याने सुरज जाधव याच्या छातीवर धारधार सुर्‍याने वार केला. तसेच सुरजबरोबर असणार्‍या इतरांवरही त्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये दोेघेजण जखमी झाले तर सुरज जाधव हा जागीच कोसळला. त्याला उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
याबाबत निलेश रमेश ढोले याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विनायक गणपत भोर, सागर शंकर ढोले, मुकूंदा गणपत ढोले, प्रसाद भारत ढोले, ज्ञानेश्‍वर मच्छिंद्र ढोले, व आणखी  दोन यांच्या विरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 190/2014 नुसार भारतीय दंड संहिता 302, 307, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी व त्यांचे लेखनिक पोलीस हवालदार राजू गायकवाड यांनी सदर गुन्ह्याचा योग्यरितीने तपास करुन आणि गुन्ह्यात आरोपींविरुद्ध पुरक व सक्षम असा परिस्थिती पुरावा गोळा करुन आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
त्यानुसार अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सदर खटला चालला. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्यावर काल अंतिम सुनावणी झाली. त्यामध्ये या खटल्यातील आरोपी विनायक गणपत भोर यास अजन्म कारावास, ज्ञानेश्‍वर मच्छिंद्र ढोले, प्रसाद भारत ढोले, मुकुंदा भारत ढोले व सागर शंकर ढोले यांना दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजीव शर्मा यांनी सुनावली आहे.
सरकारपक्षाच्यावतीने सरकारी वकील मच्छिंद्र गौते यांनी काम पाहिले. तर पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक खोसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल इनामदार, सहाय्यक फौजदार सिकंदर शेख यांनी काम पाहिले.
या खटल्यातील अल्पवयीन विधी संर्घषीत बालक यांच्यावर बाल न्यायमंडळ न्यायाधीश अहमदनगर यांच्या न्यायालयात खटला चालू आहे.

LEAVE A REPLY

*