सख्ख्या भावाचा खून; भाऊ व भावजयीला जन्मठेप

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील बीबीचा दरा, म्हसोबाझाप येथील सख्ख्या भावाचा खून करण्याच्या आरोपाच्या गुन्ह्यात मयताचा भाऊ कुशाबा बन्सी दुधवडे (वय 60 वर्षे) व भावजयी सोनाबाई कुशाबा दुधवडे (वय 50 वर्षे) यांना जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांनी भादंवि कलम 302, 452 व सह 34 प्रमाणे दोन्ही आरोपींना दोषी धरून दोन्ही आरोपीस भादंवि कलम 302 प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्यांची शिक्षा तसेच भादंवि कलम 452 प्रमाणे 2 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आरोपी कुशाबा व मयत गोविंद हे सख्खे भाऊ होते. त्यांच्यामध्ये जमिनीच्या वाटपावरून वाद होते. दि. 27 मे 2013 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास आरोपी कुशाबा व त्याची पत्नी सोनाबाई हे त्याच्या विधी संघर्षात मुलगा गणेश याच्याबरोबर मयताच्या घरात बेकायदा प्रवेश करून संगनमताने मयत गोविंद यास त्याच्या पोटावर लाथा बुक्क्याने मारहाण करून घराच्याबाहेर ओढीत आणले व बाहेर आणून नंतर आरोपी कुशाबा याने दोन्ही हाताने मयत गोविंद याचा गळा दाबून खून केला.
घटना घडली तेव्हा घटनास्थळी मयताची पत्नी एकटीच हजर होती. तीच एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. नंतर दि. 29 मे 2013 रोजी मयताच्या पत्नीने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी कुशाबा व त्याची पत्नी सोनाबाई दुधवडे यांच्या विरोधात भादंवि कलम 302, 452 व सह 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदरच्या खटल्यात पाच साक्षीदार सरकार पक्षातर्फे तपासण्यात आले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सीताबाई व वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी अंमलदार यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकील रामदास गवळी यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

*