पंचाने उलगडली जवखेड्याची घटना; तिघांच्या खांडोळ्या का व कशा केल्या याची स्पष्टोक्ती

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्याती जवखेडा प्रकारणात जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य पंचाने सर्व घटनाक्रम उलगडून सांगितला आहे. तिघांनीच तिघांच्या खांडोळ्या कशा केल्या, त्याची विल्हेवाट कशी लावली, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न कसा केला, घटनेचे कारण काय होतेे याची स्पष्टोक्ती झाली आहे. त्यामुळे ही साक्ष महत्वाची ठरली असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उमेशचंद्र यादव यांनी दिली.

जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडाची सुनावणी प्रधान जिल्हा न्यायाधीश प्रकाश माळी यांच्यापुढे सुरू आहे. बुधवारी (दि.1) अ‍ॅड. उमेशचंद्र यादव यांनी एका मुख्य साक्षीदाराची साक्ष घेतली. घटनेची उकल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी प्रबळ साक्षीदार म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातून एक पंच घेतला होता. नगरचे पथक, पोलीस उपअधिक्षक पाटील व घटनेतील आरोपी हे सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहचले होते. आरोपींनी पंचांच्या समक्ष घटना कशी केली.याचे प्रात्यक्षीक करुन दाखविले.

दि. 12 आक्टोबर 2014 रोजी घटना कशी घडली हे सांगण्यास सुरूवात केली. आरोपी तिघे त्यांच्या घरी होते. रात्रीच्या वेळी ते संजय जाधव याच्या घरी गेले. तिघांनी संजयला आवाज दिला असता ते बाहेर आले. आरोपींनी त्यांच्याशी चर्चा करण्यास सुरूवात केली. गावातील व आपल्या जवळच्या व्यक्तींवर तुझा मुलगा सुनिलची वाईट नजर आहे. त्याची चर्चा सुरू आहे.

त्यामुळे तू त्यास काही समज दे. अशा प्रकारची वाच्चता योग्य नाही. असे सांगत असताना त्यांच्यातील वाद विकोप्याला गेले. दरम्यान राग अनावर झाल्यामुळे संजय जाधव याच्या डोक्यात बांबुचा दांडा टाकण्यात आला. हा प्रकार पाहुन जयश्री जाधव बाहेर आली. तिने आरडाओरड सुरू केली, त्यामुळे तिच्या देखील डोक्यात दांडा मारण्यात आला. बाहेर आई वडील का ओरडले. हे पाहण्यासाठी सुनिल बाहेर आला असता त्याच्या देखील मानेवर कुर्हाडीचा घाव घातला.

तो मयत झाला. या दरम्यान रागाचा आवेश इतका होता की, तिघांनाही ठार मारणे या अंतीम निर्णयावर आरोपी ठाम होते. घटनेला वाचा फुटायला नको. म्हणून मात्र संजय व जयश्री यांचा गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आली. तिघांच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची. हा प्रश्न पडल्यानंतर संजय व सुनिल यांच्या मृतदेहाच्या खांडोळ्या करण्यात आल्या.

घराच्या समोरच एका बोअरवेलमध्ये डोके, हात, पाय असे तुकडे टाकले. जयश्री जाधव हिचा मृतदेह व सुनिलचे धड जवळच एका विहीरीत टाकण्यात आले. तिनही धडांची विल्हेवाट लावल्यानंतर आरोपी संजय जाधवच्या घरी आले. त्यांना ओट्यावर रक्ताचे थारोळे पडलेले दिसले. हा प्रकार उघड होऊ नये यासाठी घरातून एक परात घेऊन घराच्या जवळच असणार्‍या शेतातून माती आणली.

ती रक्तावर टाकण्यात आली. रक्ताचा पुरावा नष्ट केल्यानंतर शेतातील पिकांच्या पेंढ्या ओट्यावर आणून पसरविल्या. असा सर्व घटनाक्रम आरोपींनी केल्याचे पंचाने सांगितले. त्यामुळे हा पंच सरकार पक्षाच्या दृष्टीने महत्वाचा ठरला आहे. आज नियमित या खटल्याची सुनावणी चालणार आहे. असे अ‍ॅड. यादव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*