गुहा येथील अल्पवयीन मुलाच्या हत्याकांडाची चौकशी सुरू

0

मयताचे संगणकीय छायाचित्र पोलिसांकडून प्रसिद्ध

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर) – गुहा येथील अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध तांभेरेचे पोलीस पाटील अनिल मुसमाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल राहुरी पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे संगणकीय छायाचित्र प्रसिद्ध केले असून लवकरच या हत्याकांडाचा छडा लावणार असल्याची माहिती राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली आहे.

शनिवारी (दि. 11) नगर-मनमाड महामार्गावर ढाब्याजवळ गुहा हद्दीत बारा वर्षे वयाच्या मुलाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी काहीच धागेदोरे आढळून आले नसल्याने पोलिसांसमोर घटनेच्या तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मृतदेहाचे घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तीन दिवसापूर्वीच गळा दाबल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिला.

दरम्यान, घटनेची माहिती राहुरी पोलिसांना मिळाल्यानंतर राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. काल पोलिसांनी या घटनेतील बारकावे शोधण्याची मोहीम हाती घेतली असून कोणत्या कारणामुळे त्याचा खून झाला? हा अल्पवयीन मुलगा कोण? कुठला? याबाबतचा तपास सुरू आहे. दरम्यान, या मुलाची ओळख पटल्यानंतरच या घटनेचा पर्दाफाश होणार आहे.

त्या दुर्दैवी अल्पवयीन मुलाची ओळख पटविण्यासाठी राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. त्यासाठी त्या मुलाचे संगणकीय छायाचित्र तयार केले आहे. काल राहुरी पोलिसांनी घटनास्थळापासून जवळच असलेल्या महामार्गावरील दोन्ही बाजूच्या ढाबाचालकांकडे या घटनेची चौकशी करून ढाबाचालकांना रात्री मृतदेह जळत असताना तो दिसला का नाही? याबाबत चांगलीच कानउघाडणी केली.

LEAVE A REPLY

*