खून दडपण्यासाठी आरोपींनी केला समझोता करार!

0

अकोलेतील घटना : पोलिसांकडून आरोपीस अभय

अहमदनगर (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यातील म्हाळुंगी परिसरात जमिनीच्या वादातून दोन गटांत वाद झाले होते. यात एकाचा खून झाला होता. मात्र, मृत झालेल्या व्यक्तीच्या पत्नीस व मुलांना ठार मारण्याची धमकी देत 100 रुपयांच्या स्टॅम्पवर समझोता करार करण्यात आला.

हा गंभीर प्रकार नुकताच उघड झाला असून मृतांच्या नातेवाईकांनी आता जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे. तर दुसरीकडे खून करून क्षमा, याचना व समझोता करार करत प्रकरणे मिटली असती तर संविधान व पोलीस यांची गरज काय असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
1 जून 2017 ला म्हाळुंगी गावातील एक शेतकरी त्यांच्या शेतात गेला होता. यावेळी शेतीचे पाणी, विहीर व पाईपलाईन यांच्या कारणावरून शेतात उपस्थित असणार्‍या जवळच्या व्यक्तींशी त्याचे वाद झाले. यातून दोन गटात वादंग झाले. यावेळी राग अनावर झाल्यामुळे संबंतधित व्यक्तींनी या शेतकर्‍यांचा खून केला. हा प्रकार मयताच्या पत्नीस समजला. तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, आरोपींनी तिला अडवत धमकी दिली. तुझ्या नवर्‍या प्रमाणे तुझे व मुलांचे देखील हाल करू, असा दम भरत संबंधीत महिलेला पोलीस ठाण्यात जाण्यापासून रोखले.

हा खूनाचा गुन्हा आमच्या हातून घडला आहे. आता आम्हाला क्षमा मिळावी. यानंतर आम्ही पाच वर्षे गावात राहणार नाही. तुमच्या कुटुंबाला त्रास देणार नाही. पाणी, विहीर व पाईपलाईन यावर तुमचा ताब्यात राहिल, असे लेखी आरोपींनी मयत शेतकर्‍याच्या पत्नीला दिले. त्या महिलेच्या पाठीशी मनुष्यबळ नसल्यामुळे तिने गप्प राहणे पसंत केले. मात्र, काही दिवसातच तिन्हे पुन्हा न्यायासाठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी दखल घेतली नाही.

त्यामुळे आरोेपींनी तिच्यावर आणखीन दबाव टाकला. शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर क्षमापत्र लिहून देण्यात आले. त्यास जामीन म्हणून सहा साक्षीदारांच्या सह्या घेण्यात आल्या. आता आरोपींनी या महिलेला पुन्हा त्रास देण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांकडून या घटनेची दखल का घेतली जात नाही.

त्यामुळे मयताच्या पत्नीने पोलीस अधीक्षकांसह, महानिरीक्षक व शासन दरबारी धाव घेतली आहे. या घटनेत न्याय मिळेपर्यत लढा देण्याचा निर्धार त्या महिलेच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. गुन्ह्याच्या घटनेत दोन वर्षांनी देखील दाखल केला जातो व तपास करून आरोपींना शिक्षा होते. अकोले तालुक्यातील या घटनेत पोलीस गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

….तर पोलिसांना आरोपी करू
ग्रामीण भागात खून व अत्याचाराचे गुन्हे घडत आहे. मात्र पोलीस आरोपींना पाठीशी घालत आहे. म्हाळुंगीच्या घटनेत, आरोपी गुन्हा घडल्याचे लेखी देतात. त्याचे प्रयचित्य म्हणून पाच वर्षे गावाबाहेर राहण्यास जातो असे स्टॅम्पवर लेखी देतात. ऐवढा पुरावा असतांना पोलीस या प्रकरणात आणखीन एखाद्या खुनाची वाट पाहत आहे का? त्यामुळे योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल.
– शांताराम संगारे (रिपाई, तालुकाध्यक्ष)

हे प्रकरण मी स्वत: हाताळलेले आहे. त्यावेळी संबंधीत शेतकर्‍याचा मुत्यू हा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झालेला आहे. मयताचे शवविच्छेदन मी स्वत: करून घेतले होते. त्यामुळे हा खून आहे, असे वाटत नाही. या घटनेनंतर संबंधीतांमध्ये पुन्हा वाद झालेले आहेत. याबाबत तक्रारी दाखल आहेत. तरी देखील या घटनेची सखोल चौकशी केली जाईल.
– अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, अकोले

LEAVE A REPLY

*