अकोले : सांगाडा निघाला धामणगावच्या महिलेचा; खून करणार्‍या चिकणीच्या तरुणास अटक

0
अकोले (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथे अनोळखी महिलेचा सांगाडा सापडला होता. त्याचे रहस्य उलगडविण्यात अकोले पोलिसांना यश आले आहे. ‘नाजूक’ प्रकरणातून संबंधित महिलेचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी शांताराम सोमनाथ पवार (वय 23, रा. चिकणी, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. रात्री उशिरा आरोपीला अटक करण्यात आली. 48 तासांत अकोले पोलिसांनी या खुनाच्या गुन्ह्याचे रहस्य उलगडविल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.
झाडाला ओढणीने बांधलेल्या अवस्थेत एका अनोळखी महिलेचा सांगाडा तालुक्यातील धामणगाव आवारी येथील डवाळ डोंगराच्या दरीत आढळला होता. महेंद्र गावंडे हे सीताफळे तोडण्यासाठी गेले असता दुपारी बारा वाजेच्या सुमारास झाडाला सांगाडा लटकलेला त्यांनी पहिला व पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी पोहचले.
सांगाड्याचा पंचनामा केल्यानंतर जवळपास ज्या वस्तू सापडल्या त्यावरून प्रारंभी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंवरून प्रथमदर्शनी हा खून असल्याचा कयास पोलिसांनी बांधला. त्यानुसार पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उपनिरीक्षक विकास काळे व नितीन बेंद्रे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली.
पोलीस तपासात हा महिलेचा सांगाडा मयत संगीता शिवाजी मधे (वय 23, रा. शेरणखेल, ता. अकोले) हिचा असल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपासी अधिकारी उपनिरीक्षक विकास काळे व नितीन बेंद्रे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर निपसे, कोरडे, पोलीस नाईक पांडे, पोलीस कॉन्स्टेबल आत्माराम पवार, गोडसे, कोळगे, क्षीरसागर, सहायक फौजदार पानसरे आदींनी अधिक तपास केला.
आरोपी शांताराम पवार याने 10 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास संगीता हिचा गळ दाबला. तिच्या मृत्यूनंतर तिचे प्रेत झाडला लटकवून ठेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हे पोलीस तपासात समोर आले.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी शांताराम सोमनाथ पवार याच्याविरुद्ध भादंवि कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यास रात्री उशिरा अटक केली आहे. अवघ्या दोन दिवसांत पोलिसांनी या प्रकरणाचे गडू उलगडविले असल्याने पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर, उपनिरीक्षक विकास काळे व नितिन बेंद्रे व त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

*