पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच मुलाकडून पित्याची हत्या

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- जमीन नावावर करून दे म्हणून मुलाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार दत्तात्रय फकीर गिते (वय 52) यांनी तोफखाना पोलिसांकडे केली होती. परंतु पोलिसांनी वृध्दाच्या तक्रारीकडे गांभिर्याने लक्ष दिल नाही. त्यामुळेच वृध्दाला आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणी पोलिसांनी दत्तात्रय गिते यांचा मुलगा अशोक दत्तात्रय गिते याला ताब्यात घेतले आहे.
दत्तात्रय गिते हे मूळचे पाथर्डी तालुक्यातील गितेवस्ती येथील रहिवासी होते. अल्पभूधारक व अपंग असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होते. रोज कष्ट करून ते आपली उपजिविका करत होते. आठ वर्षापूर्वीच दत्तात्रय गिते यांच्या पत्नीचे निधन झालेले आहे. त्यानंतर त्यांनी आई व वडिलांची भूमिका निभवून मुलाचे पालन पोषण केले.
गावाकड उत्पन्नाचे साधन कमी असल्याने त्यांनी नगर गाठले. पाईपलाईन रस्त्यावर गिते यांनी सायकल व मिक्सर दुरूस्तीचा व्यवसाय सुरू केला. आपला व्यवसाय संभाळून ते मुलाचे संगोपन करीत होते. अशोक एकुलता एक असल्याने त्याचे सर्वच हट्ट ते पुरवित असायचे.
मात्र अशोक मोठा झाल्यानंतर त्याने वडिलांच्या नावावर असणारी जमीन स्वत:च्या नावे करण्याचा हट्ट धरला. यासाठी तो वारंवार वडीलांना धमकावत होता. हा प्रकार दत्तात्रय यांच्या नातेवाईकांच्या कानावर गेला. त्यांनीही अशोकची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. काही दिवसांपूर्वी अशोकने वडिलांना लोखंडी रॉडने मारहाण केली होती. परंतु काही नातेववाईकांच्या सांगण्यावरून तो जमिनीच्या विचारापासून दूर गेला होता.
गेल्या दोन दिवसांपासून अशोकच्या डोक्यात पुन्हा जमिनी नावावर करून घेण्याचा कीडा वळवळला. त्यामुळे त्याने वडिलांच्या मागे जमीन नावावर करून द्या नाही तर मी तुम्हाला मारून टाकील, अशी धमकी दिली होती. शुक्रवारी (दि.3) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गिते पिता-पितापुत्रामध्ये कडाक्याचे भांडण झाले.
या भांडण्याची माहिती गिते यांच्या नातेवाईक असलेल्या गयाबाई पालवे यांना झाली. त्यानंतर त्यांनी पिता-पुत्रातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु अशोकने भांडणामध्ये मध्यस्ती करणार्‍यांना शिविगाळ करून दमबाजी केली. याच वेळी त्याने वडिलांना रात्रीच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भयभीत झालेल्या दत्तात्रय गिते यांनी थेट तोफखाना पोलीस ठाणे गाठले.
तेथे मुलाकडून आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार दिली. पण पोलीस घटनास्थळाकडे फिरकलेच नाही. दत्तात्रय गिते यांनी मुलाला घरात कोंडून घेऊन रात्रभर घराबाहेर राहिले. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अशोक घरातून बाहेर आला. त्यावेळी दत्तात्रय हे आपल्या टपरीत काम करीत होते.
वडील जमीन नावावर करुन देत नाही. याचा राग मनात धरुन त्याने दुकानातील मिक्सर दत्तात्रय यांच्या डोक्यावर प्रहार करण्यास सुरुवात केली. सुमारे 10 ते 15 वेळा मिक्सर डोक्यावर मारल्याने दत्तात्रय रक्ताच्या थारोळ्यात पडले.
हा प्रकार भर दिवसा घडल्यामुळे नागरिकांची तोबा गर्दी झाली. या घटनेची माहिती पोलिसांना समजातच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अशोक गिते यास ताब्यात घेऊन दत्तात्रय गिते यांना रुग्णालयात हलविले. परंतु उपचारापूर्वीच गिते यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणी गयाबाई दशरथ पालवे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी अशोक गिते याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अशोकला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत.
‘त्या’ पोलिसांवर कारवाई करा…..
माझ्या जिवीतास धोका आहे. अशी तक्रार दत्तात्रय गिते यांनी पोलिसांकडे केली होती. परंतु पोलिसांनी गिते यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळेच त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून कामात हलगर्जीपणा करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक निखील वारे यांनी केली आहे.

अशोककडून नागरिकांसह पोलिसांवर हल्ला – 
वडिलांचा खून केल्याचे उघड झाल्यानंतर नागरिकांनी अशोक गिते याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने नागरिकांना प्रतिकार करत दोन जणांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांवरही त्याने हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच तो शांत झाला.

 

LEAVE A REPLY

*