शेवगाव हारवणे हत्याप्रकरण : मुख्य सूत्रधार भोसले गजाआड

0

अल्ताफ भोसलेस तीन दिवस पोलीस कोठडी

अहमदनगर (प्रतिनिधी) – शेवगाव शहरातील विद्यानगर येथे राहणारे माजी सैनिक आप्पासाहेब हारवणे यांच्यासह चार जणांची हत्या करणारा मुख्य सूत्रधार रम्या भोसले (रा. नेवासा) या तिसर्‍या आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर यापूर्वी अटक केलेल्या अल्ताफ छगन भोसले (रा. मुकींदपूर, ता. नेवासा) या आरोपीस वाढीव पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर केले असता. त्यास 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रविवारी (दि.18) विद्यानगर येथे आप्पासाहेब हरवणे यांच्यासह त्यांची पत्नी सुनंदा, मुलगी स्नेहल व मुलगा मकरंद यांची दरोडेखोरांनी हत्या केली होती. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलिसांनी यापूर्वी अल्ताप भोसले याच्यासह एका अल्पवयीन तरुणास अटक केली होती. यात अन्य तीन आरोपी अद्याप पसार होते.
त्यांच्या मागावर असताना पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपी व घटनेचा सुत्रधार रम्या छगन भोसले यास अटक केली आहे. हा भोसले टोळीचा म्होरक्या असून त्यानेच शेवगाव येेथे दरोडा टाकण्याचा कट रचला होता. चोरी करीत असताना ज्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. तसेच चोरी करताना विरोध केला त्यांना ठार मारल्याची कबुली आरोपी रम्याने दिली आहे. त्याच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सुत्रांनी दिली. यातील अन्य दोन संशयीत आरोपी पोलिसांच्या रडावर असून त्यांच्या मागावर पोलीस पथके आहेत.
दरम्यान आरोपींनी घटना कशी घडून आणली याची माहिती मिळाल्यानंतर सर्व आरोपींच्या नावांची उकल पोलिसांनी झाली होती. मात्र पोलिसांनी सावध पवित्रा घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यात अद्याप दोन आरोपी पसार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. या घटनेबाबत माहिती विचारली असता पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.
मात्र आरोपीस ताब्यात घेतल्याचा दुजोरा त्यांनी दिला. आज अटक केलेल्या रम्या भोसलेला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर अटक केलेल्या अल्ताफ भोसले याच्याकडून बरीच काही माहिती मिळाली आहे. मात्र घडलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्यामुळे त्यास वाढीव पोलीस कोठडी मिळावी यासाठी न्यायालयात युक्तीवाद मांडण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने आरोपीस आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुद्देमाल हस्तगत होणार !
अटक केलेल्या आरोपींकडून कटावणी व चाकू ताब्यात घेतला आहे. तर गुन्ह्यात वापरलेली अन्य हत्यारे तसेच घरातून नेलेला मुद्देमाल लवकरच हस्तगत होणार आहे. तसेच पोलिसांवर हल्ला करणारे आरोपी देखील काही दिवसातच पोलिसांच्या जाळ्यात येण्याचे चिन्ह असून त्यांच्याकडून पिस्तूल हस्तगत होण्याची शक्यता आहे. या आरोपींची माहिती आज पत्रकार परिषदेत सांगण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.

LEAVE A REPLY

*