माजी सैनिकासह कुटुंबातील चौघांची हत्या

0
अप्पासाहेब हरवणे
सुनंदा हरवणे
मकरंद हरवणे
स्नेहल हरवणे

हत्याकांडाने शेवगावकर हादरले, मारेकर्‍यांच्या तपासासाठी चार पथके

मुलगा व मुलीवर विषप्रयोगाचा संशय, मयत स्नेहल नगरला डी. फार्मसीला होती, श्‍वानाचा मिरी रोडवरील सातपुतेनगरपर्यंत माग,मारेकर्‍यांच्या अटकेसाठी आज शेवगाव बंद

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – शहरातील विद्यानगर भागात राहणारे माजी सैनिक अप्पासाहेब गोविंद हरवणे (वय-58 वर्षे) यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी यांची तीक्ष्ण हत्याराने निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. मृतांच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराच्या जखमा असून मुलगा व मुलीचे शरीर काळवंडल्यामुळे त्यांच्यावर विषप्रयोग करून हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. रात्रीतून एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आल्याने शेवगाव तालुका हादरून गेला आहे

शीतल संगमनेरला गेल्याने बचावली
शीतल अप्पासाहेब हरवणे ही संगमनेर येथील अमृतवाहिनी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याने सुटी संपवून एका मैत्रिणीसमवेत शुक्रवार 16 जून रोजी गेली. ती संगमनेर येथे सोमवारी जाऊ असे कुटुंबयांना म्हणत होती. मात्र मैत्रिणीमुळे ती संगमनेर येथे अगोदरच गेली व सुदैवाने ती त्या राक्षसी हत्यार्‍यांच्या तावडीतून सुटली. यामुळे मोठ्या वादळातही या घरची एक पणती प्रकाशमान राहण्यास दैवी साथ मिळाली.

हत्येचे नेमके कारण उघड झाले नसल्याने या खुनांमागील गूढ वाढले आहे. सुदैवाने या कुटुंबातील एक मुलगी शिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने ती वाचली. चारही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या दिशेने चक्रे फिरविली.

या हत्याकांडात माजी सैनिक व सध्या भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी अप्पासाहेब गोविंद हरवणे (वय-58 वर्षे), पत्नी सुनंदा अप्पासाहेब हरवणे (वय 48 वर्षे), मुलगी स्नेहल अप्पासाहेब हरवणे (वय-18 वर्षे), मुलगा मकरंद अप्पासाहेब हरवणे (वय-15 वर्षे) यांची हत्या करण्यात आली आहे. तर त्यांची दुसरी मुलगी शीतल ही शिक्षणासाठी बाहेर असल्याने यातून सुदैवाने ती बचावली आहे.

पोलिसांच्या माहितीवरून या मृतांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केलेले आहेत. मात्र रात्रीच्या नीरव शांततेत भरवस्तीतील हरवणे यांच्या घरातून कोणताही आरडा-ओरड्याचा आवाज आला नसल्याचे लगतचे रहिवासी सांगत आहेत. तसेच मृत मुलीचा चेहरा काळसर दिसत असल्याने अगोदर विषप्रयोग केला असावा अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

घराच्या बैठकीच्या खोलीतील सोफ्यावर अप्पासाहेब व खाली सुनंदा व मकरंद यांचा मृतदेह पडलेला होता. तर मुलगी स्नेहलचा मृतदेह दुसर्‍या खोलीत पडलेला होता. घटनास्थळी नातेवाईकांचा चाललेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

आज सकाळी दूधवाला आल्यानंतरही हरवणे यांच्या कुटुंबातील कोणी उठले नाही. तसेच सकाळीच घरोसमोर सडा-रांगोळी काढणार्‍या सुनंदा बाहेर दिसल्या नाहीत. यानंतर शेजार्‍यांनी घराच्या खिडकीतून डोकावले असता हत्याकांडाची घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे, पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे, उपनिरीक्षक सुहास हट्टेकर व कर्मचार्‍यांनी धाव घेऊन वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती दिली. घटनेची माहिती शहरात कळताच नागरिकांनी गर्दी केली. यामुळे पोलिसांनी घटनास्थळावर मोठा बंदोबस्त ठेवला होता.

पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी भेट देऊन मृतदेहांची व अन्य ठिकाणाची पहाणी केली. घटनेबाबत अधिकारी व मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. फॉरेर्सेनिक पथक, फिंगर प्रिंट व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाने मिरी मार्गे नगर रस्त्यालगतच्या सातपुतेनगर जवळच्या जागेपर्यंत माग काढला.

या हत्याकांडातील चारही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले. या तपासणीच्या अहवालानंतरच तपासाची दिशा ठरणार असल्याचे कळते. तालुक्यातील वडुले बुद्रुक येथील हरवणे कुटुंबीय विद्यानगर भागात अनेक वर्षांपासून राहत आहेत. कुटुंब शांत व कोणाच्या अध्यात मध्यात नसल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

अप्पासाहेब हे सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर येथील भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत होते. तर त्यांची मुलगी स्नेहल ही डी. फार्मसीचे नगर येथे शिक्षण घेत होती. दुपारी उशिरापर्यंत पोलीस पथक घटनास्थळी ठाण मांडून होते, तर नागरिकांची मोठी गर्दी होती. सायंकाळी श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी भेट देऊन पहाणी केली.

या हत्याकांडाने शेवगाव शहरासह तालुका हादरून गेला आहे. तालुक्यातील ही पहिलीच अत्यंत क्रूर घटना आहे. या हत्याप्रकरणी मृताचा मेहुणा संतोष माधव झिरपे (रा. विद्यानगर, शेवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या घटनेचा तपास करून आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी शेवगाव शहरात आज सोमवार 19 रोजी बंद पाळण्यात येणार आहे. मारेकर्‍यांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे चार तर शेवगाव पोलिसांची दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

पोलिसांसमोर आव्हान
पोलिसांच्या माहितीवरून यातील अप्पासाहेब यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आला आहे. सुनंदा यांच्या गालावर व कानावर जखम असून रक्त येत होते. मकरंद याच्या गालावर जखम असून शरीर काळवंडलेले होते. तर स्नेहल हिच्या डाव्या बाजूस व गालावर जखम असून शरीर काळवंडलेले आढळून आले. यामुळे या हत्याकांडाचे गूढ वाढले असून घटनेच्या सखोल तपासाचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

नियोजनपूर्वक कृत्य
मारेकर्‍यांनी घरात कोणतीही उचकापाचक केली नसल्याने चोरीचा उद्देश नसावा. मात्र गुन्हेगार घरात कोठून शिरले व कसे पळून गेले याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. घराच्या दारात पाणकापडी हातमोजे पडलेले होते. गुन्हेगाराने हे हत्याकांड नियोजनपूर्वक केल्याचे उघडपणे दिसत आहे.

 

LEAVE A REPLY

*