गारगोटी तस्करीच्या पैशावरूनच राजन शेटेची हत्या

0

जिल्हा पदाधिकार्‍याच्या पुतण्याचा पारनेर तालुक्यात राडा
राहुरीतील तीन आरोपींना 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

पारनेर (प्रतिनिधी) – नगर-कल्याण रस्त्यावरील काळेवाडी (सावरगाव, ता. पारनेर) येथे एका विहिरीत खोलवर सापडलेला गारगोट्यांचा जुना साठा आणि त्यातून कोट्यवधींची कमविलेली माया यातून गारगोटी तस्करांमध्ये 28 जुलैला रात्री मोठा राडा झाला. या राड्यात राहुरीतील राजन सुरेंद्र शेटे या तरुणावर गावठी कट्ट्यातून थेट तोंडात गोळ्या झाडण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला होता.

त्यामुळे याप्रकरणी मयताचा भाऊ सागर सुरेंद्र शेटे (वय- 26 राहणार- छत्रपतीनगर राहुरी) यांच्या फिर्यादीवरून अशोक सीताराम खेवरे (राहणार – देसवंडी) कैलास मारूती कुसमुडे(राहणार-वांबोरी) सचिन प्रकाश क्षीरसागर (राहणार-जोगेश्वरी आखाडा) तालुका-राहुरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत .

पारनेर तालुक्यातील काळेवाडी (सावरगाव) येथील विनोद दत्तात्रय गोडसे यांच्या विहिरीत गारगोटीची खाण सापडली होती. राहुरी येथील या चौघांनी या विहिरीतून गेल्या तीन ते चार महिन्यांत मोठ्या प्रमाणावर गारगोटी काढून विकली होती. परंतु 28 जुलै रोजी रात्री 9 वाजता गारगोटीच्या पैशातून वाद झाल्याने अशोक खेवरेयाच्याकडील गावठी कट्ट्यातून राजन शेटेच्या गालावर गोळी झाडून त्याची हत्या करून अन्य दोघांच्या मदतीने मृतदेह गाडीमध्ये घेऊन राजन शेटे याने आत्महत्या केली असल्याचा बनाव करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद सागर शेटे यांनी पारनेर पोलिसांत दिली आहे. तसेच विहीर मालकाच्या बंगल्यात राडा झाल्यानंतर या तरुणाला नगरला हलविले गेले. मात्र त्याठिकाणी तो मृत पावल्याचे जाहीर केले गेले.

गेल्या दोन ते तीन महिन्यापासून येथे गारगोटीची तस्करी चालू होती आणि याबाबत पारनेर पोलिसांना माहिती असतानाही त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. पंधरा दिवसांपूर्वीही या तस्करांमध्ये राडा झाला होता. त्यावेळी तालुक्यातील एका शिवसेना पदाधिकार्‍याने त्यात मध्यस्थी केली होती. आता हा पदाधिकारीच पोलिसांच्या रडारवर आला आहे.
काळेवाडी- सावरगाव येथे एका विहिरीचे खोदकाम चालू होते. साधारणपणे 60 फुटापेक्षा जास्त काम झाल्यानंतर एका बाजूला गारगोटीचे दगड लागले. या गारगोट्यांना बाजारात मोठी मागणी असते.

यानंतर याची माहिती गारगोटी तस्करांना मिळाली. त्यांनी येथे धाव घेतली आणि विहिरीच्या एका बाजूला जवळपास 100 फुटापेक्षा जास्त लांबीचा बोगदा तयार करीत गारगोट्या काढल्या गेल्या. रात्रीच्या सुमारास या गारगोट्यांची तस्करी राहुरीतील तरुण करीत. मोठ्या प्रमाणात पैसे मिळू लागल्याने या तस्करांमध्ये दोन गट पडले. त्यातून त्यांच्यात वादही होऊ लागले. पारनेर पोलिसांना याची माहिती मिळाली. मात्र, त्यांनी सोयीस्कर कानाडोळा केला.

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास या तस्करांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादात राजन सुरेंद्र शेटे याच्या तोंडात गोळ्या झाडल्या. त्यात तो गंभीर झाला. यानंतर त्यास अशोक सीताराम खेवरे (देसवंडी), कैलास मारुती कुसमुडे (वांबोरी) व सचिन प्रकाश क्षीरसागर (जोगेश्‍वरी आखाडा) यांनी विनाक्रमांकाच्या कारमधून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, शेटे याचा मृत्यू हा वाळू तस्करीच्या भांडणातून झाल्याची चर्चा असली तरी त्याचा खून हा गारगोट्यांच्या तस्करीतून झाला असल्याचे काळेवाडी येथील नागरिकांचे म्हणणे आहे. पारनेर पोलिसांना याची माहिती असूनही त्यांच्याकडून गारगोटी तस्करी का रोखली गेली नाही याचे उत्तर आता वरिष्ठांना शोधावे लागणार आहे.

माय फ्रेंडस् माय लाईफ ने केला घात…  काळेवाडी येथील गारगोटी प्रकरणातून गोळीबारात मयत झालेला राजन सुरेंद्र शेटे याला मित्रांचा फार लळा होता. त्यातच या मैत्रीतून गारगोटी व्यवसाय सुरू झालेला असताना पैशाचा वादातून 28 जुलैला रात्री 9 वाजता गावठी कट्ट्यातून गोळी झाडून हत्या करण्यात आली.त्यामुळे मोबाईल व व्हॉटसअ‍ॅप प्रोफाईल वर …माय फ्रेंडस् माय लाईफ..ने त्याचा घात झाला असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

LEAVE A REPLY

*