गारगोटी तस्करीतून तरूणाची गोळ्या झाडून हत्या

0

राजकीय पदाधिकार्‍यांचा हात असल्याचा संशय

पारनेर (प्रतिनिधी) – नगर-कल्याण रस्त्यावरील पारनेर तालुक्यातील सावरगाव परिसरात काळेवाडी येथे एका विहिरीत खोलवर सापडलेल्या गारगोट्यांच्या तस्करीतून वाद उफाळला. यात राहुरीच्या राजन सुरेंद्र शेटे या युवकाची गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणात जिल्हास्तरीय सेनेच्या पदाधिकार्‍यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काळेवाडी-सावरगाव येथे एका विहीरीचे खोदकाम चालू होते. साधारणपणे 60 फुटापेक्षा जास्त काम झाल्यानंतर एका बाजूला गारगोटीचे दगड लागले. या गारगोट्यांची बाजारात मोठी मागणी असते. यानंतर याची माहिती गारगोटी तस्करांना मिळाली. त्यांनी येथे धाव घेतली आणि विहीरीच्या एका बाजूला जवळपास 100 फुटापेक्षा जास्त लांबीचा बोगदा तयार करीत गारगोट्या काढल्या गेल्या. रात्रीच्या सुमारास या गारगोट्यांची तस्करी राहुरीतील युवक करीत. मोठ्या प्रमाणात पैसे मिळू लागल्याने या तस्करांमध्ये दोन गट पडले. त्यात जिल्हास्तरावरील राजकीय पदाधिकार्‍याने मध्यस्ती करत आर्थिक मोबदल्यापायी त्यात मध्यस्ती केली. यात आर्थिक लाभ होवू लागल्याने दोन गट पडून दोन्हीमध्ये वाद होऊ लागले.
पारनेर पोलिसांना याची कुणकुण लागली असता. मात्र त्यांनी मिठ मिळताच सोयीस्कर कानाडोळा केला. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास या तस्करांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादात राजन सुरेंद्र शेटे याच्या तोंडात गोळ्या झाडल्या. त्यात तो गंभीर झाला. रूग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, शेटे याचा मृत्यू हा वाळू तस्करीच्या भांडणातून झाल्याची चर्चा असली तरी त्याचा खून हा गारगोट्यांच्या तस्करीतून झाला असल्याचे काळेवाडी येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
काळेवाडी येथील गोडसे नामक व्यक्तीच्या घरात हा राडा झाला. या युवकाला नगरला हलविले गेले. मात्र, तो मृत पावल्याचे जाहीर केले गेले. गेल्या महिनाभरापासून येथे गारगोटीची तस्करी चालू होती. मात्र याबाबत पारनेर पोलिसांना या प्रकरणी काहीही माहिती नव्हते. तर घटना कशामुळे घडली. याबाबतही तपास सुरू असल्याचे पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी सांगितले.

राजन शेटे यांच्यावर राहुरीत अंत्यसंस्कार
राहुरी (तालुका प्रतिनिधी) – येथील मयत राजन शेटे या तरूणाचा पार्थिव देह शवविच्छेनानंतर काल शनिवारी रात्री साडेआठ वाजता आणण्यात आला. यावेळी शेटे कुटुंबासह राहुरी शहरावर शोककळा पसरली.
शेटे कुटुंबियांच्या सांत्वनासाठी राहुरी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेकांनी हजेरी लावली. काल सकाळपासून मयत शेटे यांच्या घरी सांत्वनकर्त्यांची रिघ लागली होती. रात्री उशिरा राहुरी येथील मुळा नदीकाठच्या गणपती घाटावरील अमरधाममध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा शोकाकुल जनसागर उपस्थित होता. 

LEAVE A REPLY

*