थकीत पगारासाठी नगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांचा ठिय्या

0
संपूर्ण थकीत पगार देण्याचे मुख्याधिकारी यांनी जाहीर केल्यानंतर आंदोलन मागे
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर नगरपरिषेदेच्या ठेकेदाराने 4 महिन्यापासून कंत्राटी कामगाराचे वेतन थकविल्याने व वारंवार नगरपालिका व ठेकेदार यांच्याकडे थकीत वेतनाची मागणी करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने कंत्राटी कामगारांनी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचे सरचिटणीस कॉ.जीवन सुरुडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेत मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर तब्बल 5 तास ठिय्या आंदोलन केले. मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी उद्या चारही थकीत पगार करण्याचे मान्य केल्यानंतर सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी कॉ.जीवन सुरुडे यांनी सांगितले की, नगरपालिकेने मे. मॅक्रो इकॉनॉमिकल एनव्हायरोमेन्ट सोल्युशन प्रा.लि. नाशिक यांना ठेका दिलेला आहे. ठेकेदाराने नगरपालिकेशी झालेल्या करारानुसार कोणत्याही अटी शर्थीचे पालन केलेले नाही. सरकारने निर्धारित केलेले किमान वेतन, पी.एफ, कर्मचारी विमा आदी बाबींचा सातत्याने ठेकेदाराने भंग केलेला आहे. दि.24 फेब्रुवारी 2015 रोजी महाराष्ट्र शासनाने सफाई कामगाराचे किमान वेतन सुधारित केलेले आहे. त्याचीही अंमलबजावणी नगरपालिकेकडून करण्यात येत नाही.

याबाबत गेल्या 2 वर्षापासून नगरपालिकेकडे लेखी तक्रारी करूनही त्यांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे प्रयत्न केले आहे. वास्तविक मुख्य मालक म्हणून नगरपालिकेने करारानुसार किमान वेतन यासर्व विविध बाबीची अमलबजावणी करणे आवश्यक आहे. ठेकेदार नियमाप्रमाने वागत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा व त्याला काळ्या यादीत टाकण्याचा पूर्ण अधिकार मुख्याधिकार्‍यांना असतानाही ते जाणीवपूर्वक कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे.

तसेंच नगरपालिकेतील सत्ताधारी ही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे ठेकेदारांची अरेरावी वाढलेली असून कामगाराची पिळवणूक करण्याचे काम ठेकेदारांने सुरू केले असल्याचा आरोप कॉ.सुरुडे यांनी केला. यावेळी सदर आंदोलनात कॉ.श्रीकृष्ण बडाख, कॉ.मदिना शेख, कॉ. लखन डांगे आदींसह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

  • कामगारांचा दिला जाणारा घनकचरा व्यवस्थापन हा निधी 14 व्या वित्त आयोगातून मिळत असल्याने त्यावर जिल्हाधिकारी यांची सही झालेली नसल्याने पैसे नगरपालिकेकडे उपलब्ध असतानाही कामगारांचे पगार रखडलेले आहे. परंतू नगराध्यक्षा आज जिल्हाधिकार्‍यांकडे सही घेण्यासाठी गेलेल्या असून सही झाल्यानंतर लगेचच कामगारांचे राहिलेले चार महिन्याचे पेमेंट लवकरात लवकर करण्यात येतील.
    -सुमंत मोर, मुख्याधिकारी, श्रीरामपूर नगरपालिका
  • आरोग्य व सफाई कामगारांच्या ठेक्याची रक्कम वाढविले. त्यामुळे या वाढीव रकमेची जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी केली. त्यामुळे कामगारांचे पगरही रखडले. आमच्या काळात चार चार महिने पगार रखडले जात नव्हते. परंतू आता सणासुदीचे दिवस असतानाही त्या गरीब कामगारांना साधा सणही साजरा करता आला नाही. तसेच या कामगारांच्या पगाराबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे 14 व्या वित्त आयोगातून पगार देण्याबाबत सत्ताधार्‍याकडून कोणताही पाठपुरावा झाला नाही. त्यामुळे कामगरांना चार चार महिने वंचित रहावे लागले. -करण ससाणे, श्रीरामपूर नगरपालिका
  • प्रशासकीय अडचणींमुळे नगरपालिकेच्या कंत्राटी कामगरांचे सुमारे चार महिन्याचे पगार रखडलेले होते. परंतू याबाबत वारंवार जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल पाठवून कामगारांचे पगार करण्याबाबत चर्चा झाली होती. परंतू कालपर्यंत कर्मचार्‍यांना पगार होतील असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे काल सकाळीच जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून कामगारांच्या पगाराबाबत सांगितले व आम्हाला चौदाव्या वित्त आयोगातून कामगारांचे पगार करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून मागणी केली. त्यांनी तातडीने परवानगी दिल्याने काल दुपारीच नगरपालिका मुख्याधिकार्‍यांना कळवून पगार करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सुचविले. त्यानुसार कालच कर्मचार्‍यांचे पगार देण्याबाबत आश्‍वासन दिले. त्यानुसार आज सर्व कर्मचार्‍यांचे पगार 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून दिले जाणार आहे.-अनुराधाताई आदिक, नगराध्यक्षा, श्रीरामपूर नगरपालिका

LEAVE A REPLY

*