Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात जून अखेरपर्यंत साडेसात हजार करोनाबाधित असतील – महापालिका आयुक्त

पुण्यात जून अखेरपर्यंत साडेसात हजार करोनाबाधित असतील – महापालिका आयुक्त

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – जूनअखेरपर्यंत पुणे शहरात करोनाचे 7500 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असतील, असा अंदाज महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. शहरातील करोनाची स्थिती आटोक्यात येत असून सद्या:स्थितीत 97 टक्के भागातील व्यवहार पूर्ववत करण्यात आले आहेत, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

दरम्यान, शहरात सामाजिक संसर्ग झाल्याचे गृहीत धरून प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.करोनाच्या सद्या:स्थितीबाबत दूरचित्रसंवादाद्वारे महापालिका आयुक्त गायकवाड आणि विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी ही माहिती दिली.

महापालिका आयुक्त गायकवाड म्हणाले, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शहरात रुग्ण दुपटीचे प्रमाण आठ दिवस होते. त्यानुसार मेअखेरपर्यंत शहरात एकूण (बरे झालेल्या रुग्णांसह) दहा हजार रुग्ण असतील, असा अंदाज महापालिका प्रशासनाने वर्तवला होता. त्यादृष्टीने आम्ही खाटा, उपचारांसह इतर आवश्यक तयारी देखील केली होती. मात्र, प्रत्यक्षात सात हजार रुग्ण मेअखेरपर्यंत शहरात होते. या पार्श्वभूमीवर शहरात करोनाची स्थिती नियंत्रणात आहे.

दरम्यान, शहरातील सध्याची करोनाची स्थिती पाहता जूनअखेरपर्यंत 7500 करोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असतील. शहरात वर्षभरात होणार्‍या मृत्यूपेक्षा करोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण कमी आहे, ही दिलासादायक बाब आहे. शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. अशा सर्वेक्षणाच्या सात फेर्‍या पूर्ण झाल्या असून आता आठव्या फेरीअंतर्गत ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, दहा वर्षांखालील बालके आणि कर्करोग, मधूमेह, अस्थमा, उच्च रक्तदाब अशा व्याधी असणार्‍या नागरिकांची तपासणी घरोघरी जाऊन करण्यात येत आहे. तसेच टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रे वगळून 97 टक्के भागातील व्यवहार पूर्ववत करण्यात आले आहेत, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या