Type to search

Breaking News maharashtra देश विदेश नाशिक मुख्य बातम्या

निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यात बंदी

Share

भाव पुन्हा कोसळणार : सरकारच्या निर्णयाने शेतकर्‍यांमध्ये नाराजी

नवी दिल्ली : कांद्याची वाढती मागणी, त्या तुलनेत घटलेला पुरवठा आणि वाढत जाणारे दर यावर नियंत्रण मिळण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांसाठी मात्र हा निर्णय घातक असून, अशा निर्णयाची काहीच गरज नसल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव कोसळणार असून राज्यातील ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारने घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्यप्रदेश या प्रमुख राज्यांमध्ये झालेला पावसामुळे कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. बाजारांमध्ये मागणीनुसार कांद्याचा पुरवठा होत नसल्याने सरकारने थेट कांद्यावर निर्यातबंदी घातल्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध भागात कांद्याची आवक कमी झालेली आहे. कांद्याचे कमी उत्पन्न झाल्यानेच केंद्र सरकारने मागणी तसा पुरवठा हे तत्त्व पाळण्यासाठी निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. देशातील विविध बाजारपेठेत एव्हाना दक्षिण भारतातून येणारा कांदा देखील अद्याप दाखल झालेला नाही. राज्यातील कांदाही उत्तर प्रदेश आणि परदेशात जाऊ लागला आहे. अशा परिस्थितीत कांद्याचे भाव गगनाला भिडून कांद्याची वानवा निर्माण होऊ नये असा सरकारचा प्रयत्न आहे.

गेल्या महिनाभरात कांदा उत्पादनात अग्रेसर असणार्‍या नगर जिल्ह्यातून हजारो क्विंटल कांदा राज्याबाहेर विक्रीसाठी पाठवला गेलेला आहे. साधारण 15 ते 20 दिवसांपूर्वी जिल्ह्यात कांदा पिकाला विक्रमी 5 हजार 500 क्विंटल भाव मिळाला होता. यात सर्वसाधारण कांद्याचा भाव 1 हजार आणि चांगल्या प्रतिचा कांद्याला 4 हजार 500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव टिकून होता. त्यानंतर काही ठिकाणी भाव अचानक कोसळल्याने शेतकर्‍यांनी आंदोलने देखील केली होती. मात्र, आता सरकारनेच कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने भाव पुन्हा कोसळणार आहेत.

निर्यातीचा कांदा देशात वळणार
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने आज जेव्हा बाजार सुरू होईल, तेव्हा सहाजिकच कांद्याची निर्यात होत नसल्याचे निर्यातीसाठीचा कांदा देशातील बाजारांमध्ये वळणार आहे. परिणामी कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार असल्याने कांद्याचे भावही घसरणार आहेत.

भाजप सरकारचा पोरखेळ : शेट्टी
भाजप सरकारच्या कांदा निर्यात बंदीला मात्र शेतकर्‍यांनी विरोध केला आहे. कांदा निर्यातबंदीचा थेट परिणाम शेतकरी आणि कांदा उत्पादकांवर होणार आहे. यापूर्वीच सरकारने निर्यात मुल्यात वाढ केल्याने त्याचा फटका शेतकर्‍यांना बसला होता. आता निर्यातच बंद केल्याने शेतकर्‍यांना मिळणार कांद्याचा भाव कोसळणार आहे. भाजप सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे निव्वळ पोरखेळ असल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. असा निर्णय घेण्याची काहीच आवश्यकता नव्हती असे राजू शेट्टी यांचे म्हणणे आहे. जेव्हा 50 पैशांनी कांदा विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली होती, तेव्हा सरकारने असा निर्णय कधीही घेतला नाही. आता सरकार व्यापार्‍यांनाही दम देत आहे. कांद्याबाबत देशभरात उद्भवलेल्या परिस्थितीचा देशातील ग्राहकांवर काही परिणाम होत आहे असे वाटत नाही. मग असे असताना सरकार शेतकर्‍यांच्या मुळावर का उठले आहे?, असा सवाल राजू शेट्टी यांनी सरकारला केला आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!