इंधन दरवाढ प्रश्नावर जनतेच्या भावना दुखाविण्याचा हेतू नव्हता : रामदास आठवले

0

नवी मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या तरी मला काही देणं घेणं नसून मी मंत्री असल्याने मला सर्वकाही मोफत असते. त्यामुळे देशात झालेली इंधन दरवाढीचा फटका मला बसला नाही. पण मंत्रिपद नसेल तर मलाही झळ सोसावी लागेल असे विधान करणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पडसाद उमटताच दिलगिरी व्यक्त करीत पेट्रोल डिझेल दरवाढ प्रश्नावर जनतेच्या भावना दुखाविण्याचा हेतू नव्हता असा खुलासा केला आहे.

इंधन दरवाढ प्रश्नावर उत्तर देताना केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटताच आठवले यांनी अधिकृत खुलासा करून दिलगिरी व्यक्त केली आहे. इंधन दरवाढीचा रिपब्लिकन पक्षाने विरोध केला आहे. इंधन दरवाढीमुळे सामान्य जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे.

सामान्य जनतेच्या व्यथा आपल्याला चांगली माहीत असून जनभावनेचा  नेहमीच आदर राखला आहे. आपण सामान्य जनतेतूनच अडीअडचणींचा सामना करूनच पुढे आलो आहोत. त्यामुळे जनतेच्या भावनांबद्दल आपण कधीही असंवेदनशील राहू शकत नाही. जनतेच्या भावना दुखाविणारे मत आपण कधीही मांडले नाही असे आठवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

इंधन दरवाढ हा गंभीर विषय आहे. याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना इंधन दरवाढ कमी करण्याबाबत चर्चा केली आहे. रिपब्लिकन पक्षानेही इंधन दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. इंधन दरवाढ प्रश्नांवर मी केलेले वक्तव्य कुणाच्या भावना दुखविणारे ठरले असल्यास त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

LEAVE A REPLY

*