Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

टीम इंडियाच्या टी-२० विश्वचषक विजयाची गौरवगाथा

Share

मुंबई : विंडीजमध्ये २००७ मध्ये ५० षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत राहुल द्रविडच्या नेतृत्वात साखळीतच पराभूत होऊन मायदेशी रिकाम्या हाती परतलेल्या भारतीय संघावर संपूर्ण देशभर प्रचंड टीका करण्यात आली. काही लोकांनी संघातील प्रमुख खेळाडूंचे फलक रस्त्यात जाळून आपला संताप व्यक्त केला.

याच वर्षी क्रिकेटच्या प्रमुख सौंस्थांपैकी एक असलेल्या आयसीसीने सप्टेंबर महिन्यात ११ ते २४ सप्टेंबर या कालावधीत प्रथमच टी २० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण २७ सामने खेळवण्यात आले होते. या स्पर्धेत १६ संघांमधून १२ संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरले होते. भारतीय संघनिवड समितीने आपल्या संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन गौतम गंभीर , युसूफ पठाण , रॉबिन उथप्पा , एम एस धोनी यासारख्या युवांना संधी दिली .

संघाच्या नेतृत्वाची धुरा धोनीच्या खांद्यावर सोपवण्यात आली. तर गोलंदाजीत इरफान पठाण , अजित आगरकर , आरपीसिंग ,हरभजनसिंग , जोगिंदर शर्मा यांना संधी देण्यात आली होती.

भारतीय संघाचा समावेश ड गटात करण्यात आला होता. या गटात भारतासोबत पाकिस्तान आणि स्कॉटलंड या संघांचा समावेश होता. मात्र भारतीय संघाचा पहिला सामना पावसाच्या व्यत्ययाने वाया गेल्यामुळे भारतीय संघाच्या खात्यात १ गुण बहाल करण्यात आला होता. भारतीय संघाला बाद फेरी निश्चित करण्यासाठी पाकला पराभूत करणे गरजेचे होते. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अत्यंत अटीतटीचा होईल अशी सर्व क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता जोर धरू पाहत होती.

प्रत्यक्षात झालेही तसेच पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली भारताने २० षटकात ७ बाद १४१ धावा काढल्या भारताकडून रॉबिन उथप्पाने शानदार अर्धशतक झळकावले. तर पाकिस्तानकडून मोहंमद असिफने सर्वाधिक ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात पाकिस्तानने २० षटकात ९ बाद १४१ धावा केल्या मिस्बाह उल हकने ५३ धावा केल्या. भारताकडून इरफान पठाण याने २ विकेट्स टिपल्या सामना टाय झाल्यामुळे बोल आऊट खेळवण्यात आला. भारताने ३-० अशा आघाडीने सामना जिंकला व थाटात बाद फेरी गाठली.

मात्र बाद फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पार पडलेल्या आपल्या पहिल्याच लढतीत भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध १० धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. आता भारतीय संघाला उपांत्य फेरी निश्चित करण्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडला पराभूत करणे आवश्यक होते. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारत आपली गाडी पुन्हा रुळावर आणली.

इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने २० षटकात ६ बाद २१८ धावा केल्या भारताकडून युवराजने शानदार १३ चेंडूंमध्ये ५२ धावा वसूल केल्या. हा सामना विशेष गाजला तो युवराजसिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर ६ चेंडूंवर खेचलेल्या ६ उत्तुंग आस्मानी षटकारांमुळे. भारतीय संघाने इंग्लंडवर मात करत उपांत्य फेरी गाठली भारताचा सामना झाला तो ऑस्ट्रेलियाशी. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १८८ धावा केल्या. भारताकडून धोनीने ३६, गंभीर २७, युवराज ७० धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला १७ धावांनी पराभूत करून भारताने अंतिम फेरीत धडक मारली.

अंतिम फेरीत भारताची गाठ पडली ती पाकिस्तानशी. पाकिस्तानचा कर्णधार शोएब मलिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताने २० षटकात ५ बाद १५७ धावा केल्या. गंभीर ७५, रोहित शर्मा ३० धावा केल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानला १५२ धावा काढता आल्या, अखेरच्या षटकात पाकिस्ताला विजयासाठी १२ धावांची गरज होती.

म्हणून कर्णधार धोनीने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला. चेंडू जोगिंदर शर्माकडे सोपवला. मात्र पहिलाच चेंडू वाईड पडला. भारतीय चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखीनच वाढली. पुढच्याच चेंडूवर मिस्बाहने षटकार मारला. आता पाकला ४ चेंडूंमध्ये ६ धावांची गरज होती. मात्र चुकीचा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस्बाह झेलबाद झाला. धोनीच्या टीमने ५ धावांनी सामना जिंकला व विश्वचषकावर आपले नाव कोरले. शहीद आफ्रिदीला मालिकावीर किताबाने सन्मानित करण्यात आले. म्यॅथु हेडनने सर्वाधिक २६५ धावा केल्या. उमर गुलने १३ विकेट्स टिपल्या.

-सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!