मुंबई : ‘टॅटू’च्या तपासावरून आठ तासांत आरोपी अटकेत, सांताक्रूझ पोलिसांची कारवाई

0

केवळ एका ‘टॅटू’च्या आधारे सांताक्रूझ पोलिसांनी आठ तासांत हत्येचा तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

बुधवारी सकाळी सांताक्रूझ येथील समुद्रकिनारी नायलॉनच्या मोठ्या पिशवीत पोलिसांना महिलेचा मृतदेह आढळला होता. त्याचा तपास करताना मृत महिलेच्या पाठीवर असणाऱ्या ‘टॅटू’च्या सहाय्याने पुढील तपास करत महिलेच्या पतीला अटक केली, पतीच्या चौकशीतून त्यानेच पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली.

अंधेरी (वेस्ट) वर्सोवा परिसरातील कवठे खाडी येथे प्रभूप्रसाद सहा (वय 38) हा रिक्षाचालक राहतो. मूळचा नेपाळचा असलेला सहा याचे मंगळवारी रात्री पत्नीशी भांडण झाले. भांडण विकोपाला गेले आ​णि संतापाच्या भरात सहा याने पत्नीचा गळा आवळून हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने जवळच्याच समुद्रात मृतदेह फेकून देण्याची तयारी केली. त्यासाठी नायलॉनची मोठी पिशवी आणून त्यात मृतदेह भरला. रात्री पत्नीचा मृतदेह त्याने समुद्रात फेकून दिला.

बुधवारी शकुंतलाचा मृतदेह सापडल्यानंतर झालेल्या शवविच्छेदनात तिच्या गळ्यावर, गालावर, पाठीवर, हातावर मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले. तिची ओळख पटविण्यासाठी अन्य पोलिस ठाण्यांतील हरविलेल्या व्यक्तींच्या नोंदी तपासण्यास सुरुवात झाली. तेव्हाच मृतदेहाच्या पाठीवर पंख असलेला ‘टॅटू’ कोरलेला आढळला. हा ‘टॅटू’ महिलेची ओळख पटविण्यास उपयुक्त ठरेल, हे लक्षात घेऊन पोलिस पथके ‘टॅटू’ कोरणाऱ्यांच्या शोधात निघाली. मोबाइलवर फोटो दाखविल्यानंतर टॅटू कोरणाऱ्यांनी त्या महिलेविषयी प्राथमिक माहिती दिली.

त्याच्या आधारावर पोलिस सहा याच्या घरी छापा टाकला. त्यानंतर तपासात सहा याने हत्येची कबुली दिली.

LEAVE A REPLY

*