Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असणारी लालपरी झाली ७१ वर्षांची

Share

मुंबई : राज्यातील खेड्या पाड्यांतून , गावागावांतून लीलया विहार करणारी आपल्या सर्वांची लाडकी लालपरी आता ७१ वर्षाची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापन दिन येत्या शनिवारी १ जून २०१९ रोजी राज्यात सर्व विभागीय आणि जिल्हापातळीवरील एसटीच्या ५६८ बसस्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन आणि खारभूमी विकास मंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली आहे.

राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी म्हणजे एसटीने काळानुसार कात टाकली असून अनेक स्वागतार्ह बदलही केले आहेत. एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे.

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तसेच गोरगरीब आणि वंचित मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे, यासाठी एसटीने पुढाकार घेत प्रवासात सवलती दिल्या आहेत, असेही मंत्री श्री. रावते यांनी सांगितले. एसटीने लालपरी पासून सुरु केलेला प्रवास हिरकणी, शिवनेरी,शिवशाही ते विठाई असा सुखद टप्प्यावर आणला आहे.

एसटीचा ७१ वा वर्धापन दिन राज्यातील सर्व एसटी आगार आणि कार्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यातील नवनिर्वाचित मा. खासदारांचे अभिनंदन आणि सत्कार संबंधित ठिकाणी करण्यात येणार असल्याचेही श्री. रावते यांनी सांगितले.

एसटीच्या मुंबईतील प्रमुख कार्यालयातही हा सोहळा करण्यात असून यानिमित्ताने गोकुळदास तेजपाल सभागृहात एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. परिवहन आणि खारभूमी मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख तसेच तसेच एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल , एसटीचे महाव्यवस्थापक सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तत्पूर्वी दुपारी दोन वाजता आयोजिलेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर आणि रामदास फुटाणे आपल्या सदाबहार काव्यसुमनांची मेजवानी उपस्थित मान्यवर आणि कर्मचारी वर्गाला देणार आहेत. त्यानंतर नवनिर्वाचित खासदार अरविंद सावंत यांचे अभिनंदन आणि सत्कार तसेच सेवाज्येष्ठ एसटी कर्मचारी आणि उल्लेखनीय कामगिरी करीत सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.

यावेळी प्रसिद्ध सिनेतारका मेधा दाढे उपस्थित राहणार आहेत. तसेच एसटीच्या चित्ररथाचेही उद्घाटन करण्यात येणार असल्याचे सांगत एसटीचे अध्यक्ष श्री. रावते यांनी राज्यातील सर्व कर्मचारी आणि एसटी प्रवाशांना ७१ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!