जिल्ह्यातील लाखो मराठा मोर्चासाठी मुंबईत!

0

नेवासा, नगरसह कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी,  जामखेड तालुक्यांतील कार्यकर्त्यांचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी) – मुंबईत होणार्‍या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी जिल्ह्यातील लाखो मराठा समाज बांधव मुंबईला काल मंगळवारी बस, अन्य वाहने, रेल्वेने रवाना झाले. नगर शहर, कोपरगाव, शिर्डी, नेवासा, राहता, श्रीरामपूर, राहुरी, अकोले, संगमनेर, पाथर्डी, पारनेर, शेवगाव श्रीगोंदा आदी ठिकाणांहून कार्यकर्ते मोर्चात सहभगासाठी रवाना झाले.
नेवासा (का. प्रतिनिधी) – मुंबई येथे होणार्‍या मराठा क्रांती महामोर्चासाठी नेवासा तालुक्यातून खासगी वाहने व रेल्वेतून सुमारे 15 हजार कार्यकर्ते व युवक काल रवाना झाले.
गेल्या वर्षी 23 सप्टेंबरच्या नगरच्या मोर्चात नेवासा तालुक्यातून सुमारे दीड लाख कार्यकर्ते सामील झाले होते. नेवाशाहून मुंबईचे अंतर अधिक असले तरी मोठ्या उत्साहाने युवक मोर्चासाठी रवाना झाले. मुंबई मोर्चाबाबत तालुक्यात जनजागृती करण्यात आली होती.

मोर्चासाठी तालुक्यातून जवळपास 120 चारचाकी वाहने रवाना झाल्याची माहिती शिवप्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी दिली. नेवासा तालुक्यातील नेवासा येथून 12 वाहने, चांदा येथून 11, नेवासा फाटा येथून 10 वाहने, वडाळा बहिरोबा येथून 5, भेंडा येथून 6, कुकाणा येथून 12, उस्थळ दुमाला येथून 6, शिरसगाव येथून 3, प्रवरासंगम येथून 5 वाहने रवाना झाल्याची माहिती मराठा संघटनांकडून देण्यात आली. नेवासा तालुक्यातील पानेगाव येथून ट्रॅव्हल्स बसने तसेच अन्य वाहनांतून कार्यकर्ते काल सकाळीच मुंबईला रवाना झाले. नेवासा तालुक्यातून मोर्चासाठी संभाजी माळवदे, रावसाहेब घुमरे, राजेंद्र उंदरे, जयवंत मोटे, विजय गाडे, संदीप गाडेकर, डॉ. घावटे, अनिल शिंदे, नंदकुमार पाटील आदी कार्यकर्त्यांनी जागृती केली. चांदा वार्ताहराने कळविल्यानुसार चांदा येथून 11 चारचाकी वाहनांतून माजी सरपंच विकास दहातोंडे, उपसरपंच संजय भगत, विजय रक्ताटे, राजेंद्र दहातोंडे, संजय दहातोंडे आदींच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते रवाना झाले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – मुंबई येथे आज काढण्यात येणार्‍या मराठा क्रांती मोर्चासाठी काल श्रीरामपूर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले. कोणी रेल्वेने, कोणी खासगी गाड्यांनी तर कोणी एसटी बसने या मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना झाले. त्यांना निरोप देण्यासाठी त्यांचे नातेवाईकही यावेळी स्टँडवर व रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. तालुक्यातून किमान 10 ते 15 हजार कार्यकर्ते रवाना झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.
मुंबई येथे होणार्‍या आजच्या मोर्चासाठी श्रीरामपूर येथील कार्यकर्त्यांनी गेल्या आठ दिवसांपासून तयारी सुरु केली होती. गावोगाव बैठका घेऊन कोण कोण कार्यकर्ते मुंबईला येणार याची यादीही करण्यात आली होती. कोणी खासगी गाडीने जायचे, कोणी रेल्वेने जायचे आणि कोणी बसने जायचे याबाबतचे नियोजन करण्यात येऊन मुंबई येथे कोणी कुठे भेटायचे याबाबतचे नियोजनही श्रीरामपुरातील कार्यकर्त्यांनी केले होते. त्यानुसार काल पंचायत समितीचे सभापती दीपक पटारे, गिरिधर आसने, रामभाऊ लिप्टे, पप्पू पटारे, विलास थोरात, भाऊसाहेब बांद्रे, अभिषेक खंडागळे, सुधीर नवले, शरद नवले यांच्यासह अन्य कार्यकर्ते काल सायंकाळीच मुंबईकडे रवाना झाले होते.

संगमनेर (प्रतिनिधी) – मुंबई येथे आज होत असलेल्या मराठा क्रांती मोर्चासाठी संगमनेरातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले आहे. मराठा क्रांती मोर्चासाठी कार्यकर्त्यांची बैठक होऊन तालुक्यात संदेश देण्यात आला होता. त्यानुसार कार्यकर्त्यांनी नियोजन केले होते. संगमनेरात मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांनी सुमारे आठ हजार पत्रके वाटून प्रचार केला. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात संदेश गेला. मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार संगमनेरात सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच करण्याचे नियोजन केले. काही कार्यकर्ते सकाळीच मुंबईला रवाना झाले तर काही जण सायंकाळी निघाले. ‘एक मराठा लाख मराठा’ च्या जयघोष करत कार्यकर्ते शहरातील ऑरेज कॉर्नर येथे जमा झाले. स्वयंमस्फूर्तीने व स्वखर्चाने कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले.

मोर्चात स्वयंमसेवक राजेंद्र देशमुख, शरद थोरात, अजित काकडे, अमोल कवडे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष खंडू सातपुते, बाळासाहेब गुंजाळ, महेश वाकचौरे, धीरज देशमुख, उमेश गुंजाळ, अभिजित, गुंजाळ, रामहरी कातोरे, रमेश गुंजाळ, मिलिंद कानवडे, प्रकाश नवले, वैभव सातपुते, अविनाश थोरात, अमोल खताळ आदिंसह तालुक्यातील सुकेवाडी, खांजापूर, कासारवाडी, गुंजाळवाडी, निमज, मालदाड, घुलेवाडी, पळसखेडे, कोकणगाव आदी ठिकाणाहून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.

राहुरी (प्रतिनिधी) – मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज मुंबईत धडकणार्‍या मराठा क्रांती मोर्चासाठी राहुरी तालुक्यातून सुमारे 200 हून वाहने रवाना झाली असून दोन हजारांहून अधिक मराठा समाज बांधवांनी मुंबईला प्रयाण केले आहे. काही कार्यकर्ते काल सकाळी खासगी वाहनांनी तर काही कार्यकर्ते रेल्वेने मुंबईला रवाना झाले. काल राहुरीतून जाणार्‍या समाजबांधवांना राहुरीच्या नागरिकांनी निरोप देऊन शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, आजच्या क्रांती मोर्चाच्या होणार्‍या तुफान गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर मराठा एकीकरण समितीच्या पाच वाहनांमधून 40 स्वयंसेवकांची ठिकठिकाणची वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली असून वाहतुकीचा चक्काजाम होऊ नये, यासाठी हे स्वयंसेवक वाहतूक सुरळीत होण्याची खबरदारी घेणार आहेत.

राहुरी तालुका मराठा एकीकरण समितीच्या वतीने राहुरी तालुक्यातून मुंबईला मोर्चात सहभागी होण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले. राहुरी तालुक्यातील प्रत्येक वाहनावर ‘एक मराठा, लाख मराठा’चे स्टीकर्स, वाहनांवर भगवे झेंडे लावून वाहने सुशोभित करण्यात आली होती. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मूकमोर्चाने निघालेल्या या रॅलीला राहुरीकरांनी उत्स्फूर्तपणे शुभेच्छा दिल्या. ही शिस्तबद्ध रॅली पाहण्यासाठी राहुरी शहरात नागरिकांनी गर्दी केली होती. गेल्या आठ दिवसांपासून राहुरी तालुक्यात मुंबईत होणार्‍या क्रांतिमोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली होती. गावनिहाय व तालुकास्तरावर मराठा समाज बांधवांची बैठक घेण्यात आली. त्यात कार्यकर्त्यांना विविध सूचना देण्यात आल्या होत्या. या मोर्चाला विविध समाजांतील बांधवांनी व विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

अकोले (प्रतिनिधी) – अकोले तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई येथे मराठा मोर्चासाठी तालुक्यातील सुमारे 350 गाड्या व चार मोठ्या बस मुंबईकडे रवाना झाल्याची संयोजकांकडे नोंद झाली असल्याची माहिती मराठा मोर्चाचे समन्वयक डॉ. संदीप कडलग यांनी दिली. मोर्चासंदर्भात तहसीलदार मुकेश कांबळे यांना मराठा समाजाच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले होते.

तालुक्यात प्रमुख गावांत मोर्चाच्या अनुषंगाने बैठका घेण्यात आल्या व जनजागृती करण्यात आली आहे. या मोर्चासाठी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब उर्फ लालू दळवी, डॉ. संदीप कडलग, भानुदास गायकर, दिलीप शेणकर, रोहिदास धुमाऴ, राज गवांदे, ओम काळे, भाऊसाहेब वाकचौरे, विश्वासराव आरोटे, व्ही. एस. गायकवाड, निलेश तळेकर, भूषण वाकचौरे, भूषण जाधव, महेश हासे, ऋषीकेश नाईकवाडी, चैतन्य पांगरे, नारायण डोंगरे, चंद्रभान सोनवणे, गोरख सोनवणे, सूर्यभान सहाणे, सुनील गवांदे, विजय गवांदे, संतोष शेटे, मोहन गायकर, गणेश गायकर, मंगेश फापाळे, अभिजित देशमुख यांच्यासह असंख्य मराठा बांधव काल मुंबई येथे दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

*