Type to search

हिट-चाट

१०० व्या नाट्यसंमेलन अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल

Share

मुंबई । अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी सिनेनिर्माते, दिग्दर्शक जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी ही घोषणा केली असून नाट्यसंमेलनाचे हे यंदाचे शंभरावे वर्षे आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जब्बार पटेल आणि प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी या दोघांचेच अर्ज आले होते. त्यावर नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत पटेल यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले असून येत्या 15 डिसेंबर रोजी होणार्‍या नियामक मंडळाच्या बैठकीत पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचे प्रसाद कांबळी आणि परिषदेचे प्रवक्ते मंगेश कदम यांनी सांगितले.

डॉ. जब्बार पटेल यांनी अनेक नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. ‘सामना’, ‘सिंहासन’, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारित ‘जैत रे जैत’, ‘मुक्ता’, पु. ल. देशपांडेंनी लिहिलेला ‘एक होता विदूषक’ आदी दर्जेदार चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. अनेक पैलू असणार्‍या आंबेडकरांचे जीवन तीन तासांच्या चित्रपटात रेखाटणे ही अवघड बाब असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा चित्रपट केला.

या चित्रपटाने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. जवळपास सर्व प्रमुख भारतीय भाषांत हा चित्रपट भाषांतरीत झाला आहे. पटेलांनी थिएटर अकादमी या प्रायोगिक नाटकांसाठीच्या नाट्यसंस्थेची स्थापना केली आहे. प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचे जब्बार पटेलांनी दिग्दर्शन करून ते परत रंगमंचावर आणले होते. या नाटकाने आता विक्रमी प्रयोगांची नोंद केली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!