Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

आंतरराष्ट्रीय बालिकादिन विशेष : उमलू द्या कळ्यांना!

Share

आज 11 ऑक्टोबर, ‘आंतरराष्ट्रीय बालिकादिन’. संपूर्ण जगभरात हा दिवस महिलांच्या आत्मशक्तीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने 19 डिसेंबर 2011 रोजी 11 ऑक्टोबर हा ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिवस’ साजरा करण्याचा प्रस्ताव पारित केला आणि 11 ऑक्टोबर 2012 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय बालिका दिवस ‘बालविवाह प्रथेचा शेवट’ या विषयाखाली साजरा करण्यात आला होता.

परंतु सामाजिक संस्थांच्या चौकटीबाहेर असा काही दिवस असतो हे अनेकांना माहीतही नसेल. म्हणून या दिवसानिमित्त बालिकांच्या स्त्रीभ्रूण हत्येपासून सुरू होणार्‍या तर लिंग भेदभाव, लैंगिक शोषण, बालविवाह, हुंडाबळी, अल्पवयात लादलेले मातृत्व, कौटुंबिक अत्याचार यांसारख्या अनेक समस्यांमधून लैंगिक शोषण या विषयावर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

मुलींचे शोषण ही गेल्या काही वर्षात प्रचंड प्रमाणात वाढलेली समस्या आहे. शाळा, ट्यूशनपासून तर स्वत:च्या घरातसुद्धा मुली असुरक्षित असल्याचे चित्र नजरेस पडते. लैंगिक शोषण म्हणजे शरीराला इजा किंवा हानी पोहोचेल असा किंवा मुलांना आवडणार नाही असा स्पर्श करणे, अशी कोणतीही कृती किंवा वर्तन की ज्यामुळे मुले घाबरतील. अश्लील हावभाव करणे याचा यात समावेश होतो.

बर्‍याच प्रकरणांत मुलांचे शोषण नातेवाईक आणि शेजार्‍यांकडून होते. नातेवाईक असल्यामुळे पालक मुलांवर विश्वास ठेवत नाहीत. तसेच विश्वास ठेवला तर नातेसंबंध खराब होतील यामुळे मुलांकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकदा मुलांना नोकर, शेजारी आदींच्या जबाबदारीवर सोडले जाते. यातूनच पुढे लैंगिक शोषणासारखे प्रकार घडतात.

अशा प्रकारांना आळा घालायचा असेल तर कुटुंब आणि शाळा यांची महत्त्वाची भूमिका असली पाहिजे. सर्वप्रथम कुटुंबातील किमान एका व्यक्तीने मुलांसाठी उपलब्ध असायला हवे. मुलांच्या सुरक्षेसाठी विभक्त कुटुंब पद्धती सोडून एकत्र कुटुंबपद्धतीला उत्तेजन देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पालकांनी मुलांशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे जेणेकरून भविष्यात मुलांना असे अनुभव आल्यास ते पालकांशी सहजपणे बोलू शकतील. शाळांनीही मुलांच्या लैंगिक शोषणाविरोधात जनजागृती केली पाहिजे. चांगला आणि वाईट स्पर्श यातील फरक शाळा आणि कुटंबातील सदस्याने मुलांना शिकवला पाहिजे.

नाशिकमध्ये चाईल्डलाईन ही संस्था 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांसाठी राष्ट्रीय पातळीवर काम करते. 1098 या हेल्पलाईनमार्फत मुलांसाठी ही संस्था काम करते. हेल्पलाईन 24 तास आणि 365 दिवस सुरू असते. या हेल्पलाईनच्या माध्यमातून हरवलेले किंवा पळून आलेले मूल, आजारी असलेले मूल, अनाथ मूल, बालकामगार, बालभिक्षेकरी, बालविवाह, रस्त्यावर राहणारे मूल, विकलांग मूल, मानवी अनैतिक वाहतुकीच्या जाळ्यात अडकलेले मूल, व्यसनाच्या आहारी गेलेले मूल अशा अनेक प्रकारच्या अडचणीत सापडलेल्या मुलांना चाईल्डलाईन मदत करते.

बालकांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी 2012 मध्ये बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला तरीही अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. यावर पर्याय एकच आहे की आपण आपल्या सभोवताली असलेल्या मुलांची काळजी घेणे, त्यांचे संरक्षण करणे. अशा घटना घडल्यानंतर बर्‍याचदा मुले आत्महत्या करून स्वत:चे जीवनदेखील संपवतात. अशा समस्या थांबवण्यासाठी सर्वच पातळीवर कार्य होणे गरजेचे आहे. आम्ही संस्थात्मक पातळीवर पुढाकार घेतला आहे. समाजातील प्रत्येक घटकाने अशा प्रकारे सहभाग नोंदवला पाहिजे.

तसेच समाजाची मानसिकता बदलणेदेखील गरजेचे आहे. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांवरदेखील स्त्रीचा आदर करण्याचे संस्कार करून त्यांच्यात सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आजची बालिका ही प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भरपणे पुढे आलेली दिसते. जसे की क्रीडा, शिक्षण, आरोग्य, राजकारण, घर या सर्व ठिकाणी ती सक्षमपणे उभी राहताना दिसते. या बालिकांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. आजच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने स्त्री संरक्षणाची शपथ घेतली पाहिजे. बालिकादिनाचे औचित्य साधून प्रत्येकाने आपापल्या परीने बाललैंगिक शोषण थांबवण्याचा संकल्प केला तर खर्‍या अर्थाने बालिकादिन साजरा होईल.

-प्रणिता तपकिरे, शहर समन्वयक, चाईल्डलाईन

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!