आज भ्रष्ट पीएंना मारहाण उद्या मंत्र्यांनाही सामोरे जावे लागेल : विखे पाटील

0

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या स्वीय सहाय्यकाने 10 लाख रूपये घेऊन काम न केल्यामुळे त्यांना मंत्री दालनात मारहाण करण्यात आली . यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. आज भ्रष्ट पीएंना मारहाण होते, अशीच परिस्थिती राहिल्यास हीच वेळ उद्या मंत्र्यांवरही ओढवू शकते, असा इशाराच त्यांनी सरकारला दिला.

या घटनेवरून टीका करताना विखे पाटील म्हणाले की, मंत्रालयात जबाबदार अधिकाऱ्यांना जनता मारहाण करते, सरकारने पारदर्शक कारभाराचे आश्वासन दिले होते आणि मंत्रालयात नेमका कसा कारभार सुरू आहे, हे या घटनेवरून लक्षात आले आहे.

मंत्रालयात एखाद्या अधिकाऱ्याला मारणे हि चुकीची गोष्ट आहे , खरे तर निषेधार्ह आहे. या घटनेसाठी राज्य सरकारची भ्रष्टाचाराप्रती उदासीन व मवाळ भूमिका कारणीभूत आहे. राज्यातील निम्म्याहून अधिक मंत्र्यांवर ठोस पुराव्यांसह भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलटपक्षी त्यांना अभय देण्याचेच उघड प्रयत्न झाले.

त्यामुळे हे सरकार भ्रष्टाचाराविरूद्ध कोणतीही कारवाई करू शकत नाही,असा स्पष्ट संदेश सर्वत्र गेला असून, त्याचा परिणाम म्हणून आता पैसे देऊन काम न झालेली मंडळी दिवसाढवळ्या मंत्रालयात घुसून अधिकाऱ्यांना मारहाण करू लागली आहेत. हीच वेळ उद्या मंत्र्यांवर आली तरी फारसे आश्चर्य वाटणार नाही, अशी खरमरीत टीका विखे पाटील यांनी केली.

या प्रकरणात कारवाई होईल, अशी अपेक्षा बाळगणेच गैर असून, हे प्रकरण सुद्धा दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल. मात्र सरकारकने याबाबत योग्य तो विचार करावा, आता ‘क्लीन चीट योजना’बंद करावी आणि 10 लाख रूपयांच्या लाचखोरीच्या या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी, असे विरोधी पक्षनेते पुढे म्हणाले.

LEAVE A REPLY

*