Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

भाजपने रात्रीच्या अंधारात दरोडा घातला : संजय राऊत

Share

मुंबई । महाआघाडीचे सर्व नेते सत्ता स्थापनेच्या रणनीतीत व्यस्त असताना पहाटे अचानक भाजप नेते देंवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अचानक घडलेल्या या राजकीय भूकंपाने महाआघाडी साकारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या सत्तापिपासूपणाबद्दल तीव्र घणाघाती टीका केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ जाहीरपणे जनतेसमोर का घेतली गेली नाही? याचाच अर्थ हे पाप आहे. भाजपने रात्रीच्या अंधारात दरोडा घातला आहे, अशा शब्दांत खासदार राऊत यांनी संताप व्यक्त केला.

दररोज सकाळी पत्रकार परिषद घेणार्‍या खासदार राऊत यांनी आजही पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला. भाजपने सत्ता, पद आणि पैशांचा गैरवापर केला आहे. त्यासाठी राजभवनालाही सोडले नाही. अजित पवार यांची जागा ऑर्थर रोड तुरुंगात आहे, असे हेच भाजपवाले भर विधानसभेत सांगत. याच धमक्या देऊन अजित पवार आणि इतर आमदारांना फोडण्यात आले का? याचाही शोध घ्यावा लागेल.

कदाचित मंत्रिमंडळाच्या पुढील बैठका अजित पवारांसोबत ऑर्थर रोडमध्ये घेण्याचे ठरले असावे, असा टोलाही राऊत यांनी लगावला. भाजपच्या खालच्या पातळीवरच्या या राजकारणाला राज्याची जनता योग्य उत्तर देईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
भाजपने इतर पक्षांतील आमदारांची फोडाफोडी करून सरकार स्थापनेचा कावा केला आहे. मात्र शिवसेना खंबीर आहे. बंड केलेल्या आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही खासदार राऊत यांनी दिला.

राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाआघाडीची नवी सत्तासमीकरणे जुळवण्यात खासदार राऊत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कोणत्याही क्षणी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून महाआघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. राष्ट्रवादी फूट पाडून अजित पवार यांनी भाजपला साथ दिल्याने शिवसेनेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!