Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

महाचक्रीवादळानंतर आता ‘बुलबुल’; जाणून घ्या सविस्तर

Share

नाशिक : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण कोकण पश्चिम किनारपट्टीसह महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अन् थांबण्याचे अद्याप नांव ही घेत नाही आहे. एक दोन नाही तर तीन तीन चक्रिवादळांची मालिकाच दिसुन येते आहे. क्यार व महा या दोन चक्रिवादळा नंतर आता प्रतिक्षा आहे ‘बुलबुल‘ चक्रिवादळाची !!

एकवीस ऑक्टोबर रोजी पश्चिम मध्य कर्नाटक भागामध्ये चक्रवाताची परिस्थिती निर्माण झाली व त्याची “क्यार‘ चक्रिवादळात निर्मिती झाली. ‘क्यार‘ चक्रिवादळाचे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी गोव्याच्या पश्चिम दिशेला मध्य अरबी समुद्रात तीव्र चक्रिवादळात रुपांतर झाले. या वेग व दिशा लक्षात घेता ते ओमान च्या पुर्व किनारपट्टीवर आदळेल असा अंदाज व्यक्त केला होता, आज दिनांक तीन नोव्हेंबर रोजी हे चक्रिवादळ ओमान कडे न वळता सोमालिया च्या उत्तर किनारपट्टीवर कमी तीव्रतेचे मुसळधार पावसात रुपांतरीत झाले.

दिवाळीच्या शेवटी शेवटी बंगालच्या उपसागरातील पश्चिम दिशेला व श्रीलंकेच्या पुर्व दिशेला हिंद महासागरामध्ये आणखी एक चक्रवात निर्माण झाला व त्याचे ३१ ऑक्टोबर रोजी हा चक्रवात दक्षिण अरबी समुद्रात पोहचला व यांचे रुपांतर ‘महा‘ या चक्रिवादळात झाले. तिथुन अरबी समुद्रात पश्चिम दिशेला सरकुन अती तीव्र स्वरुप धारण करुन मुंबई च्या पश्चिम अरबी समुद्रात दाखल झाले आहे. आता पुढे हे चक्रिवादळ थोडे कमकुवत होईल …

या वादळाचा प्रभाव गेल्या दोन दिवसापासून आपण आपल्या भागात पडत असलेल्या पावसामध्ये दिसुन येते आहे.उद्या व परवा या महा चक्रिवादळाची तीव्रता थोडी कमी होऊन दक्षिण गुजरात किनारपट्टीवर आदळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. व मोठ्या प्रमाणात पावसाचे थैमान असेल असे वाटते. यामुळे दि. ०७ नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक/ धुळे/ जळगाव या जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाने देखील या संदर्भात सावधगिरी बाळगावी यासाठी इशारा दिला आहे

गेल्या व याही वर्षी आपणास भारतीय उपखंडातील तिनही समुद्रात चक्रिवादळाची संख्या वाढली आहे हे दिसून येते आहे. सुर्यावरील सौरडागांची संख्या कमी झाल्याने पृथ्वीचा प्रवास छोट्या हिमयुगाकडे सुरू झाला आहे. त्यामुळे पृथ्वीवर येणार्या वैश्विक किरणांचा जास्तीत जास्त मारा वाढला अन् विषुववृत्ताच्या भागात ITCZ – Intertropical Convergence Zone अर्थात पावसाचे पाणी असणारे ढग जे साधारण दिड किमी उंचीवर असतात त्यांची संख्या वाढते.

यामुळे भारतीय उपखंडातील तिनही समुद्रात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि नवीन सौरसाखळी क्रमांक पंचवीस लवकर सुरु होईल असे काही चिन्हं दिसून येत नाहीत. यामुळे पुढील दोन वर्षे म्हणजे २०२१ पर्यंत लांबलेला पावसाळा अनुभवायला मीळु शकतो.

दि. ०४ नोव्हेंबर रोजी बंगालच्या उपसागरात म्हणजे अंदमान निकोबारच्या दक्षिणेस आणखी एक चक्रवात निर्माण होत आहे. उद्या दक्षिण श्रीलंके पासून पूर्वेला मलेशिया, मॅनमार पर्यंत ह्यांची व्याप्ती असणार आहे. दि. ०६ नोव्हेंबर रोजी मॅनमार जवळ आणखी तीव्र होऊन उत्तर दिशेला सरकत दिनांक सात पर्यंत बांगलादेश व पश्चिम बंगाल कडुन सरकत पुढे नऊ ते तेरा नोव्हेंबर रोजी ओरिसा पुर्व किनारपट्टीकडे सरकुन बुलबुल चक्रिवादळात निर्मिती होऊन पुन्हा विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक ते मध्यम पावसाची शक्यता वाढते आहे. या नंतरच यावर्षी पावसापासूनसुटका होईल असे दिसते..

श्रीनिवास औंधकर, संचालक
महात्मा गांधी मिशन एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबाद

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!