मुंबई पारबंदर प्रकल्प पुलाच्या पहिल्या गाळा उभारणीचा शुभारंभ

मुंबई | प्रतिनिधी

देशातील समुद्रावरील सर्वात जास्त लांबी असणाऱ्या मुंबई – पारबंदर प्रकल्पाच्या (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) पुलाच्या पहिल्या गाळा उभारणी कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाला. मुंबई-नवी मुंबईला जोडणारा हा भारतातील महत्वाकांक्षी प्रकल्प असून वेळेपूर्वीच तो पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते कळ दाबून गर्डरच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकल्पासाठीचा कालावधी 54 महिन्यांचा असला तरी सध्या त्याचे काम वेगाने सुरु आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई नवी मुंबईला जोडली जाणार असून राज्यातील नव्हे तर देशातील हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांनी यावेळी सादरीकरण केले.

असा आहे मुंबई पारबंदर प्रकल्प

मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे 22 किमी लांबीच्या  6 पदरी (3+3 मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे. या पुलाची समुद्रातील लांबी 16.5 किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे 5.5 किती इतकी आहे. या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील शिवाजीनगर व राष्ट्रीय महामार्ग-4ब वर चिर्ले गावाजवळ आंतरबदल (Interchanges) आहेत. हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा समुद्रावरील पूल ठरणार आहे.